अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळात झालेल्या वार्तांकनावरुन अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना चिमटा काढला आहे. जर प्रसारमाध्यमांनी माझ्याविषयी प्रामाणिकपणे आणि अचूक वृत्तांकन केले असते तर मला जास्त ट्विट करायची गरजच पडली नसती असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत खडेबोल सुनावले होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अप्रामाणिक, दगलबाज आणि खोटारडे आहेत, अशी आगपाखड डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. हे वक्तव्य ताजे असतानाच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांवर टीकास्त्र सोडले आहे. ट्रम्प यांनी यंदा ट्विटरचा आधार घेतला आहे. ‘प्रसारमाध्यमांनी माझ्याविषयी प्रामाणिकपणे काम केले असते तर मला ट्विट करावे लागले नसते. पण भविष्यातही ते असे काम करतील का?  हे मला माहित नाही’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे आव्हान होते. क्लिंटन यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले होते. प्रसारमाध्यमांनीही निवडणुकी संदर्भात वर्तवलेल्या भाकितांमध्ये क्लिंटन यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले होते. मात्र मतमोजणीत चित्र बदलले आणि ट्रम्प यांनी अनपेक्षित विजय मिळवला होता. या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीत ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. यात लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपांचाही समावेश होता. ट्रम्प यांच्या वादग्रस्त विधानांवरुन प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

प्रसारमाध्यमांनी केलेली टीका ट्रम्प यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी टेलिव्हिजन वाहिनींच्या पत्रकारांना आणि व्यवस्थापनातील उच्चपदस्थांना न्यूयॉर्क येथे खास बैठकीसाठी निमंत्रित केले होते. निवडणुकीदरम्यान अमेरिकी टेलिव्हिजन वाहिन्यांचे ट्रम्प यांच्यासंबंधी वार्ताकन पूर्वग्रहदूषित होते. त्यांनी निखालस खोटय़ा गोष्टी दाखवल्या आणि जनमताचा खरा कौल जाणून घेण्यात प्रसारमाध्यमे अपयशी ठरली, असा ट्रम्प यांच्या बोलण्याचा सूर होता. ट्रम्प वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा उल्लेख वारंवार अप्रामाणिक, कपटी, दगलबाज आणि खोटारडे असा करत होते असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले होते.