दिल्लीतील सीमापुरी भागात सुधारिक नागरिकत्व कायद्याच्या विरोधादरम्यान हिंसाचार उफाळला होता. दरम्यान, याबाबत एसआयटीनं मोठा खुलासा केला आहे. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात १५ बांगलादेशी नागरिकांचा सहभाग होता, असं एसआयटीकडून सांगण्यात आलं आहे. हे बांगलादेशी नागरिक अवैधरित्या सीमापुरी परिसरात राहत होते. त्यांची ओळख आता पटवण्यात आली असून त्यांच्या अटकेसाठी धाड टाकण्यास सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

२० डिसेंबर रोजी नमाज पठणानंतर दिल्लीतील सीमापुरी भागात सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करताना हिंसाचार उफाळला होता. यामध्ये १५ बांगलादेशी नागरिकांच्या सहभागाची माहिती समोर आली आहे. दरम्यान क्राईम ब्रांचची एसआयची तिहार तुरूंगात जाऊन दिल्ली हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ५५ जणांची चौकशी करणार आहेत.

कट्टरतावादी संघटनेचा समावेश
या हिंसाचारात इस्लामिक कट्टरतावादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १५ जणांचं नाव सामिल असल्याची माहिती एसआयटीकडून देण्यात आली. त्यांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. दिल्ली हिंसाचारादरम्यान ते १५ जण कुठे होते त्याचं लोकेशन ट्रेस करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली आहे.