पुलवामा येथील हल्ल्यात चाळीसपेक्षा जास्त जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर १०० तासात जैशचा कमांडर कामरान याला सुरक्षा दलांनी ठार केलं. जवानांच्या या कृतीचा मला सार्थ अभिमान आहे, यावेळी आम्ही शांत बसणार नाही जशास तसे उत्तर देणारच असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजस्थानातील सवाईमाधवपूरमधल्या रॅलीत ते बोलत होते. जे जवान शहीद झाले त्यांचा त्याग खूपच मोठा आहे. आपल्या सीमेवर वाघासारखे जवान आहेत म्हणूनच आपण निधड्या छातीनं जगाला सामोरं जात आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच यावेळी जशास तसे उत्तर देऊन हिशेब चुकता करू असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावलं आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर व्हायच्या आहेत. असं असलं तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या सभेच्या आधी त्यांनी पुलवामातील शहिदांना आदरांजली वाहिली. डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला. सवाईमाधवपूर आणि इतर भागात असलेल्या ८ पैकी ७ जागा भाजपाने गमावल्या. सवाईमाधवपूर हा सचिन पायलट यांचा गड मानला जातो तिथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जसं यश भाजपाला मिळालं त्याची पुनरावृत्ती करण्याचा भाजपाचा प्रयत्न या कृतीतून स्पष्टपणे दिसतो आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची सरशी झाल्याने त्यांचा प्रयत्न हा आहे की राजस्थानात आपल्या लोकभेच्या जास्त जागा कशा जिंकता येतील. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता हे काँग्रेससमोरचं मोठं आव्हान आहे. राजस्थानात ज्या पक्षाची सत्ता असते त्याच पक्षाला लोकसभेत जास्त जागा मिळतात असे मानले जाते. मात्र ही प्रथा मोडण्यासाठी मोदी आणि भाजपा नेत्यांनी कंबर कसली आहे असेच सभांवरून दिसून येते आहे.