रा. स्व. संघाचे सरचिटणीस सुरेश जोशी यांची मागणी

संपद पटनाईक, एक्स्प्रेस वृत्तसेवा, भुवनेश्वर

सरकारने देशपातळीवर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेची अंमलबजावणी केली पाहिजे, देशाबाहेरून आलेल्यांना परदेशी नागरिक गणले पाहिजे आणि त्यांना भारतीय नागरिकांप्रमाणे हक्क देऊ नयेत, असे रा. स्व. संघाचे सरचिटणीस सुरेश भय्याजी जोशी यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर जोशी यांनी वार्ताहरांना सांगितले की, एनआरसीचा प्रयोग केवळ आसाममध्येच करण्यात आला आहे, सरकारने योजना तयार केली तर त्याची अंमलबजावणी देशात करू शकतात आणि ती केली पाहिजे.

जे भारतीय नागरिक नाहीत त्यांना नागरिकांचे हक्क दिले जाऊ नयेत, ही आमची भूमिका फार पूर्वीपासूनची आहे, केवळ जे देशात येतात ते नागरिक नव्हेत, त्यांना परकीय नागरिक म्हणूनच गणले पाहिजे, त्यांच्याबाबत काय निर्णय करावयाचा ते सरकारच्या धोरणावर अवलूंन आहे. येथील नागरिकांच्या हक्कांपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राम मंदिराबाबत हिंदू जनतेला अनुकूल असलेला निकाल लागेल, अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली. राम मंदिराच्या उभारणीत येणारे अडथळे दूर केले पाहिजेत हे आमचे अनेक वर्षांपासूनचे म्हणणे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आसाम एनआरसी समन्वयकांची मध्य प्रदेशात बदली करण्याचे आदेश

नवी दिल्ली : आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे (एनआरसी) समन्वयक प्रतीक हाजेला यांची जास्तीत जास्त कालावधीसाठी मध्य प्रदेशमध्ये बदली करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र आणि राज्य सरकारला दिले. हाजेला यांच्या जिवाला धोका असल्याच्या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.