‘आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) मोहीम राबविण्याचा निर्णय महत्त्वाचा आणि धाडसी होता. गरज भासल्यास उत्तर प्रदेशातही ही मोहीम राबविण्यात येईल’, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, हरयाणातही या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी दिले.
योगी आदित्यनाथ यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना राज्य सरकारच्या कामगिरीबरोबरच अयोध्या खटला, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आदी मुद्यांवर भाष्य केले. आसाममध्ये या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करायला हवे. उत्तर प्रदेशमध्येही गरज भासल्यास ही मोहीम राबविण्यात येईल. आसामच्या अनुभवाद्वारे उत्तर प्रदेशातही ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवता येईल, असे आदित्यनाथ म्हणाले.
हरयाणामध्येही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री खट्टर यांनी दिले. हरयाणात विधानसभा निवडणुका होणार असून महासंपर्क अभियानाच्या निमित्ताने खट्टर यांनी न्या. एच. एस. भल्ला (निवृत्त), माजी नौदल प्रमुख सुनील लांबा यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचे समर्थन केले. हरयाणात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रम राबवण्याबाबत आपण भल्ला यांचा सल्ला मागितला आहे, असे खट्टर म्हणाले.
आसाममध्ये ३१ ऑगस्टला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पूर्ण झाली असून त्यात १९ लाख लोकांना स्थान मिळालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या २०१३ मधील आदेशानुसार आसाममध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली होती.