नानकाना साहिब येथे अलीकडेच झालेल्या विध्वंसाच्या घटनेचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी निषेध केला. ही बाब आपल्या ‘दृष्टिकोनाच्या’ विरुद्ध असून, यात गुंतलेल्या लोकांबाबत सरकार अजिबात सहिष्णुता दाखवणार नाही, असे ते म्हणाले.

‘गुरुद्वारा जन्मस्थान’ या नावानेही ओळखला जाणारा गुरुद्वारा नानकाना साहिब हे लाहोरजवळील शिखांचे पहिले गुरू गुरुनानक यांचे जन्मस्थळ आहे. माध्यमांच्या वृत्तांनुसार, एका हिंसक जमावाने शुक्रवारी या गुरुद्वारावर हल्ला करून दगडफेक केली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता.

‘नानकाना येथील निषेधार्ह घटना आणि भारतभर सध्या मुस्लीम व इतर अल्पसंख्याक यांच्यावर सुरू असलेले हल्ले यात मोठा फरक आहे. नानकानाची घटना माझ्या दृष्टिकोनाच्या विपरीत असून; पोलीस व न्यायपालिका यांसह माझे सरकार ती मुळीच खपवून घेणार नाही’, असे ट्वीट इम्रान यांनी केले.

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन अल्पसंख्याकांची दडपशाही करण्याचा आणि मुस्लिमांविरुद्ध ठरवून हल्ले करण्याचा आहे, असाही दावा इम्रान खान यांनी केला. सरकारचे पाठबळ असलेले भारतीय पोलीस मुस्लिमांविरुद्धच्या हल्ल्याचे नेतृत्व करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

भारताने या पवित्र गुरुद्वारातील विध्वंसाचा जोरदार निषेध केला असून; तेथील शीख समुदायाची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे आवाहन पाकिस्तान सरकारला केले आहे.