पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नूर-अल-हक कादरी यांनी दहशतवादी हाफिज सईदची भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. दहशतवादी हाफिज सईद हा मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. नूर-अल-हक-कादरी हे पाकिस्तानचे सौहार्द मंत्री आहेत. दिफा-ए पाकिस्तानी या परिषदेने ऑल पार्टी कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री कादरी यांच्यासह दहशतवादी हाफिज सईदही सहभागी झाला होता.

पाकिस्तानच्या कुरापती वाढल्याने पाकिस्तानसोबत भारताने शांती चर्चा धुडकावून लावली. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेतही भारताने पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले होते. आता तर पाकिस्तानचे मंत्रीच भारतावर हल्ला करणाऱ्या हाफिज सईदची भेट घेताना दिसत आहेत.पाकिस्तानचा असा दुटप्पीपणा वारंवार समोर आला आहे. भारतात कोत्या मनाचे लोक सत्तेवर आहेत म्हणून दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकत नाही असे इम्रान खान यांनी म्हटले होते. आता त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या हाफिज सईदच्या भेटीबाबत त्यांच्याकडे काही उत्तर आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.