रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीला विलंब होत असतानाच दुसऱ्याबाजूला अयोध्या कारसेवकपूरम येथे रामजन्मभूमी न्यासातर्फे चालवल्या जाणाऱ्या कार्यशाळेत कामाचा वेग मंदावला आहे. या कार्यशाळेत राम मंदिर उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीचे काम चालते. पैसा आणि कारागिरांच्या कमतरतेमुळे कार्यशाळेतील कामाचा वेग मंदावला आहे. या कार्यशाळेची जबाबदारी संभाळणाऱ्या एका व्यक्तीने ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

१९९० पासून राम मंदिर उभारणीसाठी या कार्यशाळेत काम चालू आहे. राम जन्मभूमी प्रकरणी तातडीची सुनावणी करण्याची अखिल भारतीय हिंदू महासभेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. याप्रकरणी पूर्वीच तारीख दिली असल्याचे सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान सांगितले. जनभावना लक्षात घेता याप्रकरणी त्वरीत सुनावणी व्हावी असे अपील हिंदू महासभेने केले होते. दरम्यान, राम मंदिर प्रकरणी मागील सुनावणीवेळी केवळ तीन मिनिटांच्या आत न्यायालयाने २०१९ च्या जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात १४ याचिका दाखल झाल्या आहेत.

अवश्य वाचा : अयोध्या : तातडीची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, हिंदू महासभेची फेटाळली याचिका

कारसेवकपूरममधील कार्यशाळेत प्रस्तावित राम मंदिराची लाकडी प्रतिकृती उभारण्यात आली असून देशाच्या वेगवेगळया भागातून काही भाविक उत्सुकतेपोटी या प्रतिकृती पाहण्यासाठी येतात तर काहींना स्थानिक टूर गाइड घेऊन येतो. मंदिर उभारणीसाठी लागणाऱ्या दगडांवरील ५० टक्के नक्षीकाम काम पूर्ण झाले आहे. याचा अर्थ पहिला मजला तयार आहे.

राम मंदिर-बाबरी मशीद खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक निकाल येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. एकदा का आम्हाला हिरवा कंदिल मिळाला कि, मंदिर उभीरणीचे काम झटपट सुरु होईल असे अन्नू भाई सोमपूरा यांनी सांगितले. ते कार्यशाळेचे प्रमुख आहेत. मंदिराचा जो मूळ आराखडा आहे त्यानुसार राम मंदिर २६८ फूट लांब, १४० फूट रुंद आणि १२८ फूट उंच असेल. मंदिरामध्ये एकूण २१२ खांबांचा वापर करण्यात येईल असे सोमपूरा यांनी सांगितले. प्रत्येक मजल्यावर १०६ खांब आणि प्रत्येक खांबावर १६ पुतळे असतील. सध्या निधीची सुद्धा कमतरता जाणवत आहे असे सोमपूरा यांनी सांगितले.