बिहार विधनासभा निवडणुकीसाठीचा महाआघाडीतील जागा वाटपाचा पेच सुटला आहे. राष्ट्रीय जनता दल – १४४ व काँग्रेस – ७० जागा लढवणार आहे. तसेच, डावीआघाडी २९ मतदारसंघातून लढणार असल्याचे ठरले आहे. तेजस्वी यादव यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत घोषणा केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीएम-४,सीपीआय-६, सीपीआय(माले) -१९, काँग्रेस-७० आणि राजद – १४४ जागांवर लढणार आहे. अशी माहिती तेजस्वी यादव यांनी दिली आहे.

२०१५ च्या विधानसभा निडवणुकीत राजद-१०१, जेडीयू – १०१ व काँग्रेस ४१ जागांवर निवडणूक लढली होती. तेव्हा जेडीयू महाघाडीचा घटक होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत जेडीयू भाजपाबरोबर एनडीए आघाडीचा प्रमुख घटक आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए निवडणूक लढवत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणुकीअगोदरच यूपीएला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी(रालोसपा)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी यूपीएची साथ सोडत. बसपाला सोबत घेऊत तिसरी आघाडी निर्माण केली आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.
या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.