मध्य प्रदेशच्या शाळांमध्ये हजेरी लावण्यासाठी विद्यार्थ्यांना आता यस सर किंवा यस मॅमच्या ऐवजी जय हिंद बोलावं लागणार आहे. मंगळवारी याबाबतचा आदेश मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आला आहे. नवीन शालेय वर्ष सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व सरकारी शाळांना हा नियम लागू होणार आहे.

१५ मे २०१८ रोजी हा आदेश येथील शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील १.२२ लाख सरकारी शाळांमध्ये हजेरी घेताना विद्यार्थ्यांनी जय हिंद बोलणं अनिवार्य असेल, असं या आदेशात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना जागृत व्हावी हा यामागचा उद्देश आहे अशी अधिकृत माहिती मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे.

सध्या हा आदेश केवळ सरकारी शाळांसाठी आहे. मात्र, खासगी शाळांमध्येही हा नियम लवकरच अनिवार्य केला जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री विजय शाह यांनी दिली. सप्टेंबर २०१७ मध्ये सतना येथे हा आदेश सर्वप्रथम जारी करण्यात आला होता. जर हा प्रयोग सतनामध्ये यशस्वी झाला तर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या संमतीने सर्व राज्यात हा नियम लागू केला जाईल अशी माहिती त्यावेळी शाह यांनी दिली होती.