काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर असून सोमवारी ते मतदारसंघातील एका शाळेत कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी तिथल्या विद्यार्थींनीशी संवाद साधतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. राहुल गांधी विद्यार्थीनींशी चर्चा करत असताना एका विद्यार्थीनीने त्यांना प्रश्न विचारला. देशात जे कायदे बनतात त्याची देशाच्या ग्रामीण भागामध्ये योग्य पद्धतीने अंमलबजावणी का होत नाही ? त्यावर राहुल यांनी तुम्ही हा प्रश्न मोदींना विचारा, सध्या सरकार मोदी चालवत आहेत. आमचे सरकार नसून ज्यावेळी आमचे सरकार असेल त्यावेळी आम्ही उत्तर देऊ.

त्यावर त्या मुलीने अमेठीमध्ये वीज-पाणी या सुविधा का नाहीत? असा प्रश्न केला. त्यावर राहुल म्हणाले अमेठी योगीजी चालवत आहेत. माझे काम लोकसभेत कायदे बनवायचे आहे. अमेठी त्यांना चालवायचे आहे. ते पाणी आणि वीज दोन्ही देत नाहीत. ही सर्व कामे त्यांनी केली पाहिजेत पण त्यांचे काही दुसरेच सुरु आहे असे ते म्हणाले. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीमधून खासदार आहेत.

लखनऊ विमानतळावर उतरल्यानंतर राहुल गांधी यांचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यावेळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना घेराव घातला व पक्षात पैसे घेऊन तिकीटे वाटली जात असल्याचा आरोप केला. त्यावर तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करु असे आश्वासन त्यांनी दिले.