सैतानावर दगड मारण्याच्या प्रथेदरम्यान गुरुवारी मक्केपासून पाच किलोमीटरवरील मीना येथे झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १४ भारतीयांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली. चेंगराचेंगरीत १३ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. या दुर्घटनेत एकूण ७१७ यात्रेकरू मृत्युमुखी पडले आहेत.
मृतांत हैदराबाद येथील बीबीजान मजिद (वय ६०) आणि केरळातील महम्मद या दोघा भारतीयांचा मृत्यू ओढवला असून जखमींतही ओदिशा व लक्षद्वीपमधील तिघांचा समावेश आहे. हज यात्रेवर प्रारंभापासूनच शोकाचे सावट होते. दोन आठवडय़ांपूर्वीच मक्केतील अल-हरम या मशिदीलगत क्रेन कोसळून ११ भारतीयांसह ११५ भाविकांचा मृत्यू झाला होता. हज यात्रेत भारतातून एक लाख ३६ हजार यात्रेकरू गेले आहेत. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. हज यात्रेत सैतानाला दगड मारण्याची प्रथा आहे. सैतानाचे प्रतीक असलेल्या खांबांवर यात्रेकरूंना दगड मारणे सोपे व्हावे आणि एकाचवेळी अधिकाधिक यात्रेकरूंना सामावून घेऊन गर्दी कमी करण्यासाठी सौदी प्रशासनाने एक अब्ज डॉलर खर्चून पाच मजली जमारात ब्रिज ही वास्तू उभारली आहे. या वास्तुमुळे दर तासाला तीन लाख भाविकांना दगड मारण्याची प्रथा पार पाडता येते. या वास्तूतील क्रमांक २०४ आणि २२३ या मार्गिकांदरम्यान गर्दी खोळंबून चेंगराचेंगरी सुरू झाली, असे सांगण्यात येते.
चेंगराचेंगरीनंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्यात तब्बल चार हजार कार्यकर्ते सहभागी असून जखमींना २२० रुग्णवाहिकांतून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. सौदी प्रशासनाने एक लाख सैनिकही तैनात ठेवले आहेत. ’ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे सुरू झाली, याबाबत उलटसुलट तर्क सुरू आहेत. काही आफ्रिकी देशांतून आलेल्या मुस्लिमांमुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप मध्यवर्ती हज समितीचे अध्यक्ष युवराज खलिद अल-फैजल यांनी केला आहे.
इराणच्या हज संघटनेच्या अध्यक्षांनी मात्र, जमारात वास्तूकडे जाणारे दोन रस्ते सौदी प्रशासनाने बंद केल्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि एकाच जागी हजारो लोक अडकून हा प्रकार ओढवल्याचा आरोप केला आहे. ‘अल् जझीरा’ वृत्तवाहिनीने मात्र ही चेंगराचेंगरी भाविकांच्या छावण्यांदरम्यानच्या रस्त्यावरच झाल्याचा दावा केला आहे.