News Flash

Independence Day 2018: बलात्कारासारख्या सैतानी वृत्तीपासून देशाला मुक्त करण्याची गरज: मोदी

Independence Day 2018: ७२ व्या स्वांतत्रदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून दिल्लीतील लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Independence Day 2018: दिल्लीत लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले.

Independence Day 2018: महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. मात्र, यासोबतच सैतानी वृत्तीही समोर येते. बलात्कारासारख्या सैतानी मनोवृत्तीपासून देशाला मुक्त करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७२ व्या स्वांतत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण केले. यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. मोदी सरकारचा या टर्ममधील हा शेवटचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा असून भाषणात मोदी काय बोलणार याची उत्सुकता होती. मोदींनी भाषणात सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामकाजाचा पाढा वाचून दाखवला. तसेच काँग्रेसप्रणित यूपीए सरकार आणि मोदी सरकारच्या कामाच्या पद्धतीतील फरकही सांगितला.

देश तोच आहे, जमीन, आकाश, समुद्र, सरकारी कार्यालय देखील तेच आहे. निर्णय घेणारी प्रशासकीय यंत्रणाही तीच आहे. मात्र, तरीही गेल्या चार वर्षात देशाने बदल अनुभवला. कृषीपासून ते आर्थिक पातळीवर सरकारने विविध योजना राबवल्या, असे त्यांनी सांगितले.

देशातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरुन विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. अखेर मोदींनी या घटनांवर मौन सोडले. मोदी म्हणाले, देशात महिलाशक्तीचे दर्शन घडत आहे. पण दुसरीकडे महिलांवरील बलात्काराच्या घटनाही घडतात. या सैतानी वृत्तीपासून देशाला मुक्त करण्याची गरज आहे. बलात्कार हा पीडित मुलीसाठी जितका वेदनादायी असतो तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त वेदना समाजालाही झाल्या पाहिजे, असे त्यांनी सांगितले. भाषणानंतर मोदींनी कार्यक्रमासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांची भेट घेतली.

Live Blog
08:58 (IST)15 Aug 2018
देशाला राक्षसी मनोवृत्तीतून मुक्त करायचे आहे: मोदी

बलात्कार पीडित मुलीला ज्या त्रासाचा सामना करावा लागतो त्या वेदना मी समजू शकतो. देशाला या राक्षसीवृत्तीतून मुक्त करायचे आहे

08:52 (IST)15 Aug 2018
तिहेरी तलाकविरोधात कायदा येणारच: मोदी

तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून आम्ही कायदा करत आहोत, मात्र काही लोक त्याला विरोध करत आहेत. मी मुस्लीम महिलांना आश्वासन देतो की हा कायदा येणारच

08:48 (IST)15 Aug 2018
काश्मीरमध्ये गोळीच्या मार्गाने पुढे जायचे नाही: मोदी

जम्मू- काश्मीरमध्ये गोळीच्या नव्हे तर गळाभेट घेऊन आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आगामी काळात तेथील ग्रामस्थांनाही महत्त्वाचे अधिकार मिळणार, तिथे पंचायत तसेच महापालिका निवडणुका होतील यासाठी आमचे प्रयत्न सुरु.

08:40 (IST)15 Aug 2018
देशात दलालांचे दुकान बंद: मोदी

काळा पैसा व भ्रष्टाचाऱ्यांना माफ करणार नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाते. देशातील दलालांचे दुकानही बंद पाडले.

08:33 (IST)15 Aug 2018
योजनेचे श्रेय सरकारचे नव्हे करदात्यांचे: मोदी

देशातील विविध योजना या करदात्यांच्या पैशांमधून राबवल्या जातात. या योजनांचे श्रेय हे सरकारचे नव्हे तर प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांना.

08:31 (IST)15 Aug 2018
पंतप्रधान जनआरोग्य अभियान २५ सप्टेंबरपासून: मोदी

२५ सप्टेंबरपासून पंतप्रधान आरोग्य अभियानाला सुरुवात होईल. देशातील गरीब जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळणे ही काळाची गरज

08:24 (IST)15 Aug 2018
१३ कोटी लोकांना मुद्रा कर्ज: मोदी

देशातील १३ कोटी लोकांना मुद्रा कर्ज देण्यात आले असून यातील ४ कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले आहे. यातून देशातील बदल दिसून येतो.

08:22 (IST)15 Aug 2018
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार: मोदी

कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार

08:20 (IST)15 Aug 2018
चार वर्षात देशाने बदल अनुभवला: मोदी

देश तोच आहे, जमीन, आकाश, समुद्र, सरकारी कार्यालय देखील तेच आहे. निर्णय घेणारी प्रशासकीय यंत्रणाही तीच आहे. गेल्या चार वर्षात देशाने बदल अनुभवला आहे.

08:14 (IST)15 Aug 2018
देशाच्या प्रगतीत शास्त्रज्ञांचाही वाटा: मोदी

१०० हून अधिक उपग्रह अंतराळात सोडून भारताने जगाचे लक्ष वेधले. अंतराळ क्षेत्रातील वाटचाल लक्षणीय असून आगामी वर्षांमध्ये अंतराळात मानवाला पाठवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. 

08:08 (IST)15 Aug 2018
ईशान्य भारतातून विकास कामांच्या बातम्या येतात: मोदी

पूर्वी ईशान्य भारतातून वीज नाही, लोक रस्त्यावर अशा स्वरुपाच्या बातम्या यायच्या. पण आता काळ बदलला आहे. आता तिथे विकास कामे होत असून स्थानिकांना रोजगार मिळू लागला आहे. तरुण स्वत:चे व्यवसाय सुरु करत आहेत.

08:04 (IST)15 Aug 2018
जीएसटी सर्वांनाच हवे होते: मोदी
07:56 (IST)15 Aug 2018
भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था: मोदी

जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने नाव नोंदवले आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान

07:54 (IST)15 Aug 2018
...तर आणखी १०० वर्षे लागली असती: मोदी

२०१३ च्या वेगाने काम केले असते गॅस सिलिंडर घराघरात पोहोचवण्यासाठी तसेच घराघरात शौचालये बांधण्यासाठी आणखी १०० वर्षे लागली असती. मोदींकडून भाजपा सरकार आणि काँग्रेस सरकारच्या कामाची तुलना

07:52 (IST)15 Aug 2018
२०१४ मध्ये जनतेने देश घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले: मोदी

२०१४ मध्ये जनतेने देश घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले. देशातील १२५ कोटी जनता म्हणजे टीम इंडिया.

07:49 (IST)15 Aug 2018
संसदेचे यंदाचे अधिवेशन सामाजिक न्यायासाठी: मोदी

संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन सामाजिक न्यायासाठी समर्पित होते. दलित, मागासवर्गीय, महिलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी संसदेने पावले उचलली

07:48 (IST)15 Aug 2018
देश यशाचे शिखर गाठत आहे: मोदी

आज देशाकडे आत्मविश्वास आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करत देश यशाचे शिखर गाठत आहे. आजचा दिवस देशात एक नवीन उत्साह घेऊन आला आहे: मोदी

07:44 (IST)15 Aug 2018
स्वातंत्र्यवीरांना नमन

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना मी नमन करतो: मोदी

07:42 (IST)15 Aug 2018
चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचे मोदींकडून कौतुक

आदिवासी मुलांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवून देशाची शान वाढवली: नरेंद्र मोदी

07:39 (IST)15 Aug 2018
लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण
07:39 (IST)15 Aug 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ला येथे आगमन
07:38 (IST)15 Aug 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाट येथे

लाल किल्ल्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

Next Stories
1 Independence Day 2018 : लाल किल्ल्यावर जय्यत तयारी; पंतप्रधान मोदी राष्ट्राला संबोधीत करणार
2 मुलाच्या शौर्य चक्राचा आनंद, पण मी ढासाळलेय; शहीद जवान औरंगजेबच्या आईची प्रतिक्रिया
3 Independence Day 2018 : स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, जनतेकडून मध्यरात्री फटाके फोडून जल्लोष
Just Now!
X