देशाची राजधानी राजधानी सुरक्षित राहावी यासाठी आता भारत अमेरिकेकडून नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम – II (NASAMS-II) खरेदी करण्याच्या तयारीत आहे. भारत याचा उपयोग स्वदेशी, रशियन आणि इस्त्रायली तंत्रज्ञान प्रणाली एकत्रित करून हवाई ढाल बनवण्यासाठी करणार आहे. दरम्यान, हे क्षेपणास्त्र खरेदी केल्यास दिल्लीवर कोणत्याही क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा, तसेच ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासूनही संरक्षण मिळणार आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका NASAMS-II या क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी अंतिम मसुद्याचे स्वीकृती पत्र जुलै ते ऑगस्टदरम्यान पाठवण्याची शक्यता आहे. 6,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च असलेल्या परदेशी सैन्य विक्री कार्यक्रमाअंतर्गत अमेरिका भारताला या क्षेपणास्राची विक्री करणार आहे. तसेच दिल्लीच्या जवळ या क्षेपणास्त्राच्या बॅटरीच्या उभारण्यासाठीही जागांची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दोन ते चार वर्षांच्या कालावधीत NASAMS-II हे क्षेपणास्त्र भारताला मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने यापूर्वीच NASAMS च्या अधिग्रहणासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर भारताने अमेरिकेला औपचारिक पत्र पाठवले होते.

सध्या अमेरिका भारतावर टर्मिनल हाय अॅल्टीट्यूड एरिया डिफेंस (THAAD) आणि पॅट्रियट अॅडव्हाँस्ड कॅपेबिलिटी (PAC-3) मिसाइल डिफेंस सिस्टमच्या खरेदीवर विचार करण्यासाठी दबाव टाकत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5.43 अब्ज डॉलर्सच्या उन्नक एस – 400 टायम्फ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच स्क्वाड्रन्ससाठी रशियाशी यापूर्वीच व्यवहार करण्यात आला आहे.

यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने रशियाबरोबर एस – 400 चा व्यवहार केला होता. अमेरिका भारतावर प्रतिबंध घालण्याची भीती असतानाही भारताने हा करार केला होता. मेरिकेच्या THAAD ची रशियाच्या एस – 400 शी तुलना करणे योग्य नसल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. NASAMS हे क्षेपणास्त्र प्रामुख्याने दिल्लीच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात येणार आहे. तर भारत खरेदी करणार असलेले एस – 400 हे क्षेपणास्त्र ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2023 या कालावधीदरम्यान भारताला मिळेल. एस – 400 सिस्टम 380 किमीपर्यंत असेलेला बॉम्ब, जेट, टेहळणी विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोनची माहिती घेण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे.

NASAMS च्या माध्यमातून दिल्लीची सुरक्षा केली जाणार आहे. या क्षेपणास्त्रावर जमिनीवरून हवेत मारा करणारे स्टिंगर क्षेपणास्त्र, बंदूक प्रणाली AIM-120C-7 AMRAAMs (मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र) वापरण्यात येणार आहे. थ्री डायमेंशनल सेंटीनल रडाल प्रणालीवर हे आधारित असेल. दरम्यान, या क्षेपणास्त्राची बाहेरील लेअर डीआरडीओद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या स्वदेशी बीएमडी प्रमालीद्वारे तयार करण्यात येणार आहे. या प्रणालीतील उन्नतहवाई संरक्षण (AAD) आणि पृथ्वी वायू संरक्षण (PAD) इंटरसेप्ट क्षेपणास्त्र भविष्यात शत्रूच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी तयार करण्यात आले आहे. याद्वारे 15 ते 20 किमीपासून 80 ते 100 किमीपर्यंतच्या उंचीवरून 2000 किमीपर्यंतचे लक्ष्य भेदता येणे शक्य आहे.
तर दुसरीकडे एस 400 सिस्टमच्या माध्यमातूनही संरक्षण केले जाणार आहे. यामध्ये 120, 200, 250 आणि 380 किमीपर्यंत लक्ष्य भेदणारी क्षेपणास्त्रे असतील. यामध्ये रडार, लॉन्चर्ससारख्या अत्याधुनिक सुविधाही देण्यात येणार आहेत. त्यानंतर इस्त्रायल आणि भारताने संयुक्तरित्या विकसित केलेल्या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली बराक – 8 ला सेवेत सामावून घेतले जाणार आहे.