बीजिंग : भारत व चीन यांनी एकमेकांशी असलेल्या मतभेदांवर मात करून एकमेकांचे काळजीचे मुद्दे ओळखून काम करावे, कारण दोन्ही देशातील संबंधांना आता जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.

जयशंकर यांनी तीन दिवसांच्या बीजिंग भेटीचा मंगळवारी समारोप केला. त्याआधी त्यांनी त्यांचे समपदस्थ वँग यी यांच्याशी भारत-चीन यांच्यातील संबंधांवर चर्चा केली. अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे विश्वासू मानले जाणारे उपाध्यक्ष वँग क्विशान यांचीही त्यांनी भेट घेतली.

शिनहुआ या सरकारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, भारत व चीन हे मोठय़ा अर्थव्यवस्था असलेले विकसनशील देश आहेत. भारत व चीन यांच्यातील संबंध हे आता द्विपक्षीय राहिलेले नाहीत, तर त्याला जागतिक परिमाण मिळाले आहे.  बदलत्या जागतिक परिस्थितीत जग आता बहुध्रुवीय झाले असून भारत व चीन यांनी एकमेकांशी संपर्क व समन्वय वाढवण्याची गरज आहे, त्यातूनच जागतिक शांतता, स्थिरता व विकास यात मोठे योगदान देता येईल. दोन्ही देशातील तरुण पिढीला या देशांच्या संस्कृती एकमेकांशी किती जोडलेल्या आहेत याची कल्पना नाही. त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीतून दोन्ही देशांनी इतिहासाबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. गेल्या ६९ वर्षांचा इतिहास पाहिला तर दोन्ही देशांना एकमेकांपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. आताचे शतक हे आशियाचे शतक बनवायचे असेल तर भारत व चीन यांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.

वँग यांच्याबरोबरच्या चर्चेत जयशंकर यांनी सांगितले, जम्मू काश्मीरबाबत घेतलेला निर्णय ही भारताची अंतर्गत बाब असून त्याचा चीन बरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काहीही परिणाम होणार नाही.