सर्जिकल स्ट्राईकशी आम्हाला काही घेणे देणे नाही, आम्हाला शांतता महत्त्वाची आहे आणि यासाठी भारत – पाकिस्तानने चर्चा करणे गरजेचे आहे असे मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी मांडले आहे. उरी हल्ल्यावरील प्रश्नावरही फारुख अब्दुल्ला संतापले असून मी त्यावर काही बोलणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यावर अब्दुल्ला यांनी भर देत केंद्र सरकारला अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण करुन दिली आहे. ‘आपण शेजारी निवडू शकत नाही असे वाजपेयी म्हणायचे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेशिवाय पर्याय नाही’ असे त्यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकत्र बसून तोडगा काढला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

बुरहान वानी या दहशतवाद्याचा सैन्याने खात्मा केल्यापासून काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू आहे. ९० हून अधिक दिवसांपासून काश्मीर हिंसाचाराने धूमसत असून या पार्श्वभूमीवर शुक्रवारी फारुख अब्दुल्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत काँग्रेसचे गुलाम अहमदमीर, माकपचे मोहम्मद युसूफ तारीगामी, पीपल्स डेमोक्रेटीक फ्रंटचे अध्यक्ष आणि आमदार हकीम यासीन, माजी कृषी मंत्री गुलाम हसन मीर, अवामी इत्तेहाद पक्षाचे नेते इंजिनियर रशिद आदी मंडळी या बैठकीत सहभागी झाली होती. उरी हल्ल्यावरही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. मी या हल्ल्यावर प्रतिक्रिया देणार नाही, मला फक्य राज्याला वाचवायचे आहे आणि शांतता कायम राहावी यासाठी प्रयत्न करायचे आहेत असे त्यांनी सांगितले.
आज आम्ही राज्याविषयी चर्चा केली. चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यावरही चर्चा केली. अगोदर काय झाले हे आता महत्त्वाचे ठरत नाही, गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराचा सर्वसामान्यांवर होणा-या परिणामांमुळे मी व्यथीत झालो आहे असे त्यांनी सांगितले.