भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा अनादर करण्याचा ट्विटरचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा भारताने ट्विटरला दिला असून; लेह हे चीनमध्ये असल्याचे दर्शवल्याबद्दल ट्विटरची कठोर शब्दांत कानउघाडणी केली आहे.
भारताच्या संवेदनशीलतेचा आदर राखावा, असे बजावणारे व चुकीच्या नकाशाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र सरकारने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना लिहिले आहे.
लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात शहीद झालेल्या सैनिकांसाठी लेह येथे उभारलेल्या ‘हॉल ऑफ फेम’ या युद्ध स्मारकातून केलेल्या थेट प्रक्षेपणात ट्विटरच्या जिओटॅगिंग फीचरमध्ये ‘जम्मू व काश्मीर, चिनी प्रजासत्ताक’ असे दर्शवल्यानंतर ट्विटरवर टीकेचा भडिमार झाला आणि समाजमाध्यम वापरकर्त्यांनी याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या मायक्रोब्लॉगिंग व्यासपीठाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नेटिझन्सनी केली.
अशा प्रकारचे प्रयत्न केवळ ट्विटरची अप्रतिष्ठाच करत नाहीत, तर एक मध्यस्थ म्हणून त्याची निष्पक्षता व तटस्थता यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, असे माहिती तंत्रज्ञान सचिव अजय साहनी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पत्रात काय?
* लेह हे लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यालय असून, लडाख तसेच जम्मू व काश्मीर हे दोन्ही भारताच्या घटनेनुसार कारभार होणारे भारताचे अविभाज्य भाग आहेत, याची साहनी यांनी या पत्राद्वारे आठवण करून दिली आहे.
* भारतीय नागरिकांच्या संवेदनशीलतेचा आदर करावा असे सरकारने ट्विटरला सांगितले असून, नकाशात प्रतिबिंबित झाल्याप्रमाणे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा अनादर करण्याचा कुठलाही प्रयत्न मान्य न होणारा व बेकायदेशीर आहे, असेही स्पष्ट केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 23, 2020 12:00 am