पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी भारतातील ३४ टक्के कुटुबांकडे अन्नासाठी पैसे नाहीत असा दावा करत मदत करण्यास आपण तयार असल्याची ऑफर दिली होती. इम्रान खान यांनी ट्विट करत भारतातील परिस्थिती बिकट असल्याचा दावा केला होता. भारताकडून इम्रान खान यांना चोख उत्तर देण्यात आलं असून करोनाशी लढण्यासाठी भारताने जितकं पॅकेज जाहीर केलं आहे, तितका तर पाकिस्तानचा जीडीपीदेखील नाही अशी आठवण करुन दिली आहे.

इम्रान खान यांनी आपण भारताची मदत करण्यासाठी पाकिस्तानचा कॅश ट्रान्सफर प्रोग्राम शेअर करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. इम्रान खान यांनी भारतात करोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांना हलाखाची परिस्थिती सहन करावी लागत असल्याचा दावा करणारे ट्विट केले होते. इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे.

“पाकिस्तान आपल्या लोकांना पैसे देण्याऐवजी देशाबाहेरील बँक खात्यांमध्येच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ओळखलं जातं. इम्रान खान यांना नवे सल्लागार आणि चांगली माहिती मिळण्याची खूप गरज असल्याचं स्पष्ट दिसत आहे,” असं चोख उत्तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिलं आहे. अनुराग श्रीवास्तव यांनी ऑनलाइन मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. “आपल्या सर्वांना पाकिस्तानवर असणाऱ्या कर्जाची माहिती आहे. कर्जामध्ये ते पूर्णपणे बुडाले आहेत. पाकिस्तानचा जितका वर्षाचा जीडीपी नाही त्याहून जास्त भारताने पॅकेज जाहीर केलं आहे,” असं प्रत्युत्तर अनुराग श्रीवास्तव यांनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाशी लढण्यासाठी तसंच वेगवेगळ्या क्षेत्रांना उभारी देण्यासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

इम्रान खान यांनी काय म्हटलं आहे –
इम्रान खान यांनी एका बातमीचा दाखला देत ट्विट करत म्हटलं आहे की. “या रिपोर्टनुसार भारतातील ३४ टक्के कुटुंबातील लोक कोणत्याही मदतीविना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहू शकत नाहीत. मी भारताला मदत तसंच कॅश ट्रान्सफर प्रोग्राम शेअर करण्यास तयार आहे. आमच्या कॅश ट्रान्सफर प्रोग्रामचं जागतिक स्तरावर कौतुक करण्यात आलं आहे”. इम्रान खान यांनी आपल्या सरकारने एक कोटी कुटुंबापर्यंत आर्थिक मदत पोहोचवल्याचा दावा केला आहे.