लडाखच्या पूर्वेकडील भागात भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे त्याबद्दल दोन्ही देशांमध्ये शुक्रवारी राजनैतिक स्तरावर चर्चा करण्यात आली आणि या प्रश्नावर शांततापूर्ण चर्चा करून, एकमेकांच्या मतांचा आदर करून मतभेद सोडविण्याचे मान्य करण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव आणि चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासंचालक वू जिआंघाओ यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे याबाबतचा थेट उल्लेख टाळण्यात आला आणि सद्य:स्थितीसह दोन्ही देशांनी परस्पर संबंधांबाबतचा आढावा घेतला, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. दोन्ही देशांच्या नेतृत्वाने जी मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत त्याद्वारे मतभेद सोडविण्याचे मान्य करण्यात आले, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

लेफ्टनंट जनरल स्तरावर आज चर्चा

लडाखच्या पूर्व भागात भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे, त्यावर चर्चेद्वारे मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कराची लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चा शनिवारी होणार आहे. भारताचे नेतृत्व लेफ्ट. जन. हरिंदरसिंग करणार आहेत, तर चीनचे नेतृत्व तिबेट लष्करी जिल्ह्य़ाचे कमांडर करणार आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता ही चर्चा लडाखच्या पूर्वेकडील चीनच्या प्रदेशात होणार आहे.