भाजप नेते राम माधव यांचा दावा

बीजिंग : भारत-चीन सीमावादातील पश्चिम सीमेवरचा भाग वगळला तर अन्य भागातील सीमावाद सोडविण्यात यश आल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते राम माधव यांनी केला आहे. भारत-चीन सीमावादातील चर्चेची २१वी फेरी लवकरच सुरू होत असून त्या पाश्र्वभूमीवर बोलताना माधव यांनी याबाबतची द्विपक्षीय चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे प्रतिपादन केले.

भारत-चीनदरम्यान ३, ४८८ कि.मी. लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असून याबाबतचा वाद सोडविण्यासाठी आतापर्यंत चर्चेच्या २० फेऱ्या झाल्या आहेत. चर्चेची पुढील फेरी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्यात लवकरच होणार आहे. चीन भेटीवर आलेले राम माधव भारतीय प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले की, सीमावादाबाबत फारशी प्रगती झाली नसल्याचा समज काही खरा नाही. चर्चेबाबत प्रतिदिनी माहिती दिली जात नाही.

काही निश्चित टप्पा गाठल्यानंतर याबबात माध्यमांना माहिती दिली जाते. दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीन दावा करत असलेल्या अरुणाचलबाबतही तुम्ही म्हणता ते खरे आहे का, या प्रश्नावर माधव यांनी स्पष्ट बोलण्यास दिला. उभय देशांतील पश्चिम सीमेबाबत खरा वाद असून याबाबत लवकरच होणाऱ्या फेरीमध्ये चर्चा होईल.