पुढील वर्षाच्या अखेरीस, अचूक लक्ष्य साधणारे बॉम्ब (ग्लाईड बॉम्ब) भारताच्या लढाऊ विमानांच्या शस्त्रसाठ्यामध्य़े समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेने(डीआरडीओ) तयार केलेले हे बॉम्ब भारतामधील पहिलेच अशाप्रकारचे शस्त्र आहे.

या बॉंम्बची मारकक्षमता अधिकाधिक विकसित करण्याचे काम सध्या चालू आहे. यात १०० किलो, २५० किलो आणि ५०० किलो इतक्या वजनाचे हे बॉम्ब असणार आहेत. तसेच या ‘बॉम्बस्’च्या नवीन तंत्रज्ञानामुळे लढाऊ विमानाच्या क्षमतेपलीकडेही हल्ला करणे शक्‍य होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या नव्या बॉम्बस् बाबतीत डीआरडीओ प्रमुख व्ही.के.सारस्वत म्हणाले, “सुरक्षित अंतरावरून अचूक लक्ष्यभेद करणे या बॉम्बमुळे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाशी निगडीत सर्व चाचण्या पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण करुन हे बॉम्ब वायुसेनेस उपलब्ध करुन देण्यात येतील.”