सद्य:स्थितीच्या जागतिक पाहणीतील निष्कर्ष; लोकशाही निर्देशांकात घसरण

नवी दिल्ली : जागतिक लोकशाही निर्देशांकात भारताची १० अंकांनी घसरण झाली असून तो आता ५१ व्या स्थानापर्यंत खाली आला आहे. द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ईआययू) च्या वतीने २०१९ या वर्षांसाठी लोकशाही निर्देशांकाची क्रमवारी जारी करण्यात आली असून त्यात नागरी स्वातंत्र्याचा संकोच झाल्याने भारताची घसरण झाल्याचे दिसून आले.

भारताला २०१८ मध्ये एकूण ७.२३ गुण मिळाले होते. नव्या क्रमवारीनुसार २०१९ मध्ये ६.९० गुण मिळाले आहेत. ‘ईआययू’ने जारी केलेल्या लोकशाही निर्देशांक क्रमवारीतून जगातील विविध देशांमधील लोकशाही राज्यव्यवस्थेच्या सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला. भारताची या निर्देशांकात १० अंकांनी घसरण झाली असून तो आता ५१ व्या क्रमांकावर आहे.

चीनचे गुण २०१९ मध्ये २.२६ आले असून त्याचा क्रमवारीत १५३ वा क्रमांक लागला आहे. चीनमध्ये अल्पसंख्याकांवर शिनजियांग प्रांतात मोठय़ा प्रमाणावर अत्याचार करण्यात आले असून तेथे नागरिकांवर डिजिटल टेहळणी केली जाते. त्यामुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मोठा संकोच झाला आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या ब्राझीलचा ५२ वा क्रमांक लागला. त्यांना ६.८६ गुण मिळाले तर रशियाचा ३.११ गुणांसह १३४ वा क्रमांक लागला. पाकिस्तान ४.२५ गुणांसह १०८ वा, श्रीलंका ६.२७ गुणांसह ६९ वा,  बांगलादेश ५.८८ गुणांसह ८० वा आला आहे. नॉर्वे आघाडीवर असून त्यांच्या पाठोपाठ आइसलँड व स्वीडन यांचे क्रमांक आहेत. पहिल्या दहांत यांच्याशिवाय न्यूझीलंड (४), फिनलंड (५), आर्यलड (६), डेन्मार्क (७),  कॅनडा (८), ऑस्ट्रेलिया (९), स्वित्र्झलड (१०) याप्रमाणे क्रमांक लागले आहेत. सर्वात तळाला उत्तर कोरिया १६७ व्या क्रमांकावर आहे.

परिस्थिती घसरली..

निवडणूक प्रक्रिया, विविधता, सरकारची कामकाज पद्धती, राजकीय सहभाग, राजकीय संस्कृती व नागरी स्वातंत्र्य या घटकातील कुठल्याही देशाची कामगिरी हा निर्देशांक ठरवताना विचारात घेतली जाते. या घटकातील गुण मोजून ही अंतिम क्रमवारी ठरवली जाते. गेल्या वर्षभरामध्ये जनआंदोलन, नागरिकांचा सरकारी धोरणांप्रति असलेला विरोध यांच्यामुळे जगभरामध्ये भारताची प्रतिमा बदलत चालली असून या क्रमवारीतून ते स्पष्ट झाले आहे.

वर्गवारी कशी?

ज्या देशात पूर्ण लोकशाही असेल त्यांना ८ गुण मिळणे अपेक्षित असते. सदोष लोकशाही ६ किंवा त्यापेक्षा कमी गुण, संमिश्र राजवट ४ पेक्षा अधिक व सहा किंवा त्यापेक्षा कमी गुण, एकाधिकारशाही असलेल्या देशाला ४ किंवा त्यापेक्षा कमी गुण अशी ही वर्गवारी करण्यात येते.