देशातील ज्या नोंदणीकृत राजकीय पक्षांनी गेल्या पाच ते १० वर्षांत कधीही कोणतीही निवडणूक लढविलेली नाही अशा पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा विचार निवडणूक आयोग करीत आहे.
देशात १६०० हून अधिक नोंदणीकृत राजकीय पक्ष असून त्यापैकी २०० पेक्षा कमी राजकीय पक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, असे मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी शनिवारी सांगितले.
एखाद्या पक्षाने पाच, सात अथवा १० वर्षांत एकही निवडणूक लढविलेली नसल्यास अशा पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत, असे ब्रह्मा यांनी येथे स्पष्ट केले. ज्या राजकीय पक्षांनी किमान दोन-तीन राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका आणि संसदेची एकही निवडणूक लढविलेली नसल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आम्ही विचार करीत आहोत, असेही ब्रह्मा म्हणाले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सध्या आम्ही असमर्थ आहोत. मात्र जनतेने दबाव टाकला, तर राजकीय पक्षांच्या अशा प्रकारच्या बनावट नोंदणीला आळा घालणे शक्य होईल.
‘राजकीय पक्षांच्या पळवाटा’
राजकीय पक्षाची नोंदणी झाली की त्याचे अनेक लाभ मिळतात, प्राप्तिकरातही आर्थिक सवलत मिळते. आम्ही निवडणूक लढली, परंतु विजय मिळाला नाही, असा युक्तिवाद राजकीय पक्ष नेहमीच करतात; परंतु ज्यांनी महापालिकाच नव्हे, तर पंचायत निवडणुकांमध्येही कधीही भाग घेतलेला नाही, असे अनेक पक्ष आहेत आणि ही दुर्दैवाची बाब आहे, असेही ब्रह्मा म्हणाले.