भारत आणि इस्रायलमधील संरक्षण सहकार्य संबंध अधिक भक्कम करण्याच्यादिशेने आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. चीन आणि पाकिस्तानसाठी निश्चित ही चिंता वाढवणारी बातमी आहे. भारत इस्रायलकडून शस्त्रास्त्रांची आयात करतोच, पण आता भविष्यात दोन्ही देश मिळून, अत्याधुनिक हाय-टेक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार आहेत. दोघांनी मिळून बनवलेल्या या हाय-टेक शस्त्रास्त्रांची मित्र राष्ट्रांना निर्यात करण्याची योजना आहे. भारत आणि इस्रायलमध्ये झालेला हा करार म्हणजे चीन-पाकिस्तानसाठी निश्चित एक झटका आहे.

भारतीय आणि इस्रायली संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण सहकार्यासंबंधी एक गट कार्यरत आहे. आता आणखी एका सबग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. या सब वर्किंग ग्रुपवर तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त विकास आणि उत्पादन, टेक्नोलॉजी सुरक्षा, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, कल्पकतेला चालना देणे आणि तिसऱ्या देशांना संयुक्त निर्यातीची जबाबदारी असणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- मालदीवने भारताला साथ देत पाकिस्तानला दिला झटका

मागच्या दोन दशकांपासून भारताला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या पहिल्या चार देशांमध्ये इस्रायल आहे. इस्रायल भारताला दरवर्षी एक अब्ज डॉलर्सपर्यंत संरक्षण सामुग्रीची निर्यात करतो. “भारतातील संरक्षण उद्योगही आता मजबूत झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन संयुक्त संशोधन-विकास आणि उत्पादन निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

“मिसाइल, सेन्सर्स, सायबर-सिक्युरिटी आणि अन्य डिफेन्स सिस्टिममध्ये इस्रायल जगात आघाडीवर आहे” असे या अधिकाऱ्याने सांगितले. भारताकडून संरक्षण मंत्रालयातील रक्षा उद्योग आणि उत्पादनाचे संयुक्त सचिव संजय जाजू आणि इस्रायलकडून संरक्षण मंत्रालयातील आशिया अँड पॅसिफिक रीजनचे संचालक इयाल कॅलिफ या सब वर्किंग ग्रुपचे प्रमुख असतील.

आणखी वाचा- आरोप करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावलं; POK वरील अवैध ताबा सोडा

IAI, राफेल अ‍ॅडव्हान्स डिफेन्स सिस्टिम, एल्बिट, एल्टा सिस्टिम या इस्रायली कंपन्यांनी भारतीय कंपन्यांसोबत सात संयुक्त उपक्रमात भागीदारी केली आहे. कल्याणी ग्रुप आणि राफेलमध्ये गुरुवारी एक सामंजस्य करारही झाला. १९९९ सालच्या कारगिल युद्धात इस्रायलने इमर्जन्सीच्या स्थितीत भारताला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संरक्षण संबंध विकसित होत गेले. २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भारत-इस्रायल संबंध अधिक बळकट झाले. फाल्कन रडार सिस्टिम, हेरॉन ड्रोन, बराक क्षेपणास्त्र विरोधी सिस्टिम, स्पाइस-२००० बॉम्ब अशा अनेक इस्रायली बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा वापर भारतीय सैन्य दलांकडून सुरु आहे.