पाक व्याप्त काश्मीर क्षेत्रातून सुरु होणाऱ्या चीन-पाकिस्तान बससेवेला भारताने तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर’ अंतर्गत पाक व्याप्त काश्मीरमधील बससेवेला भारताने विरोध नोंदवल्याचे मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले आहे. भारताकडून चीन आणि पाकिस्तानच्या १९६३ ‘सीमारेषा करार’लाही मान्यता मिळालेली नाही. अशात पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सुरु करण्यात येणारी बस सेवा भारताच्या स्वायत्तेचे उल्लंघन आहे, असे ते म्हणाले.

चीन आणि पाकिस्तान पाक व्याप्त काश्मीरमध्ये चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडोअर अंतर्गत बससेवा सुरु करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. ही बससेवा एका खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीकडून संचलित केली जाणार आहे. येत्या १३ नोव्हेंबरपासून याची सुरुवात होणार असून ही बससेवा लाहोर ते चीनमधील काशगरपर्यंत जाणार आहे.

३० तासांच्या या प्रवासासाठी १३ हजार रुपये भाडे आहे. तर परतीचे तिकीट २३ हजार रुपये आहे. या सेवेचे मोठ्याप्रमाणात अडव्हान्स बुकिंगही करण्यात आले आहे.