भारतीय रेल्वेने आता देशातील अव्वल ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अ‍ॅमेझॉनला रेल्वेने सामान नेण्यास प्रायोगिकत्वावर परवानगी दिली आहे. तीन महिन्यांसाठी ही परवानगी देण्यात आली असून गर्दीची वेळ वगळून या मालाची रेल्वेने ने-आण करता येणार आहे अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रवासी तिकीटाशिवाय इतर माध्यमांमधून रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे समजते.

रेल्वे मंत्रालाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे रेल्वेच्या पार्सल सुविधेला मोठा फायदा होईल. “भारतीय रेल्वेने कामी गर्दीच्या वेळेत ई-कॉमर्स कंपनीच्या समानाची ने-आण करण्यासाठी प्रायोगिकतत्वावर प्रकल्प राबवला जाणार आहे,” अशी माहिती रेल्वेने आपल्या अधिकृत भूमिकेमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने सध्या दिवसाला सात मेट्रीक टन सामानाची वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. पूर्व रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या पश्चिम बंगालमधील सीलदाह ते डांकुनी या २२ किलोमीटरच्या अंतरावर ही सेवा सुरु केली जाणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळामध्ये माल डब्ब्यामधून या सामानाची ने-आण करता येणार आहे. यामुळे सध्याच्या प्रवाशांना आणि मालवाहतुकीला कोणताही फटका बसणार नाही असं रेल्वेचं म्हणणं आहे.

या निर्णयामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लागेल असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे अ‍ॅमेझॉनचा मालवाहतुकीचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे ग्राहकांपर्यंत अधिक जलदगतीने समान पोहचू शकेल. डांकुनी येथे मालवाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेत अ‍ॅमेझॉनने सीलदाह ते डांकुनी हा मार्ग निवडला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

जर हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर ई-कॉमर्स कंपन्याही अशा मालवाहतुकीसाठी पुढे येतील असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. “हा प्रयोग यशस्वी ठरल्यास अ‍ॅमेझॉन इतर मार्गावरही याची अंमलबजावणी करेल,” असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.