संयुक्त राष्ट्रात भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी, भारत पाकिस्तानात दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांची भेट घेऊन भारताविरोधात एक डॉसियर सोपवले.

यूएनमध्ये भारताने त्यावर पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानला अबोटाबादची आठवण करुन दिली आहे. याच ठिकाणी अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या स्पशेल फोर्सेसनी कंठस्नान घातले होते. इस्लामाबादच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूताने अँटोनियो गुट्रेस यांना खोटेपणाचे डॉसियर सोपवले आहे, असे भारताने म्हटले आहे.

पाकिस्तानने खोटेपणाचे डॉसियर सोपवले असून त्याची विश्वासहर्ता शून्य आहे, असे यूएनमधील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी.एस. तिरुमुर्ती यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

“पाकिस्तानने कागदपत्र तयार करुन, खोटी कथा रचली आहे. ते त्यांच्यासाठी अजिबात नवीन नाहीय. यूएनने घोषित केलेले दहशतवादी, संघटना पाकिस्तानात आहेत, अबोटाबाद लक्षात आहे ना?” असे तिरुमुर्ती यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

यूएनमधील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांची भेट घेतली व त्यांच्याकडे भारताविरोधात डॉसियर सोपवले. यात भारत दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.