दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून आलेले चर्चेचे निमंत्रण भारताने स्वीकारले आहे मात्र ही चर्चा काश्मीर मुद्दयावर होणार नसून ती सीमेवर होणा-या दहशतवादी हल्ल्यांवरच होईल असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या चर्चेसाठी भारताचे पराराष्ट्र सचिव एस जयशंकर हे इस्लामाबादला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या  ‘स्वातंत्र्य दिना’दिवशी काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय उच्चायुक्तानां पत्राद्वारे चर्चेचे निमंत्रण पाठवले होते. या निमंत्रणाला उत्तर देत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत भारताने आपला हात पुढे केला आहे. निमंत्रण पाठवताना जम्मू काश्मीरच्या विषयावर परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानमध्ये येऊन चर्चा करावी असे म्हटले होते, यावर भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी देखील इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी जाण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु या चर्चेदरम्यान सीमेवरून होणारा दहशतवादी हल्ला हा विषयच चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. गेल्या महिनाभरापासून काश्मीर खो-यातील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तानकडून सुरू आहे त्यामुळे दोन्ही देशातील संबध आणखीनचे बिघडले होते. पाकिस्तानचा काश्मीर खो-यातील हिंसाचारात वाढत चाललेला हस्तक्षेप ही भारताची डोखेदुखी ठरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी पाकच्या पंतप्रधानाचे पराराष्ट्र सल्लागार सरताज अझीज यांनी पाकिस्तान भारताला काश्मीरप्रश्नी चर्चेसाठी निमंत्रण पाठवणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र हा प्रस्ताव भारताने याआधीच फेटाळून लावला होता. पाकिस्तानसोबत यापुढे काश्मीरप्रश्नी नाही तर सीमेवरून होणा-या दहशतवादी हल्ल्यावरच चर्चा केली जाईन असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते.