कोरोनाव्हायरसमुळे चीनमधून भारतात होणाऱ्या आयातीला मोठा फटका बसला आहे. भारतात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आयात एकटया चीनमधून होते. कोरोनाव्हायरसमुळे भारताने कापड, सूटकेस, रेफ्रिजेटर, अ‍ॅंटीबायोटीक्ससह १०५० वस्तुंची चीनऐवजी अन्य देशांमधून आयात शक्य आहे का? ते पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.

चीनमधून आयात होणाऱ्या वस्तुंची यादी मोठी आहे. ऑटोमेटिक डाटा प्रोसेसिंग मशीन, सेमीकंडक्टर उपकरण, गाडयांचे भाग, मोबाइल फोन, स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमची उत्पादने यांचा यामध्ये समावेश होतो. व्यापार विभागाच्या पहिल्या फेरीच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली आहे. चीनकडून पुरवठा बाधित झाल्यानंतर भारताने जगभरातील आपल्या दूतावासांना पत्र लिहून, संभाव्य पुरवठादारांचा शोध घेण्यास सांगितले आहे.

चीनऐवजी अन्य कोणाकडून पुरवठा होऊ शकतो, अशा काही संभाव्य बाजारपेठा शोधण्यात आल्या असून, त्यांचे विश्लेषण सुरु आहे. अ‍ॅंटीबायोटीक्समध्ये स्वित्झर्लंड, इटलीकडून पुरवठा होऊ शकतो. जगभरात अ‍ॅंटीबायोटीक्सचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये चीनसह हे दोन देश सुद्धा आघाडीवर आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि मोबाइल फोनच्या आयातीसाठी काही देशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या क्षेत्रावर चीनचे वर्चस्व आहे. त्यामुळे हे इतके सोपे सुद्धा नाही.

विषाणू उद्रेकामुळे जगातील अब्जाधीशांचे ४४४ अब्ज डॉलरचे नुकसान

करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत ५७ देशांत पसरला असून अनेक शेअर बाजार घसरल्यामुळे गेल्या काही दिवसांत जगातील ५०० श्रीमंत व्यक्तींचे ४४४ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

डाऊ जोन्सचा औद्योगिक सरासरी निर्देशांक १२ टक्क्यांनी घसरला आहे. पाच दिवसांत लागोपाठ झालेली ही घसरण २००८च्या आर्थिक पेचप्रसंगानंतर पहिल्यांदाच दिसून आली. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत ६ लाख कोटी डॉलर क्षणार्धात बुडाले. यातून जगातील ५०० अब्जाधीशांनी या वर्षांच्या सुरुवातीपासून कमावलेला ७८ अब्ज डॉलरचा नफाही मातीमोल झाल्याचे ‘ब्लूमबर्ग’ अब्जाधीश निर्देशांकातून समोर आले आहे.