भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांचे रक्ताळलेले फोटो आणि व्हिडिओ दाखवणाऱ्या पाकिस्तानला भारताने झापले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी पाकिस्तानची कानउघडणी केली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तसेच जिनेव्हा करारानुसार कोणत्याही जखमी जवानाला अशोभनीय पद्धतीने दाखवले जाऊ नये हे माहित असूनही अभिनंदन यांचे रक्ताळलेले फोटो, व्हिडिओ पाकिस्तानकडून पाठवले जात आहेत ही बाब निषेधार्ह आहे.

बुधवारी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. भारताच्या वायु दलाने प्रत्युत्तर देणं सुरु करताच पाकचे विमान माघारी फिरले. हवाई दलाने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून ते पाकच्या हद्दीत जाऊन कोसळले आहे. यादरम्यान भारताचे मिग २१ हे लढाऊ विमान देखील कोसळले आहे. या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या विमानात अभिनंदन वर्थमान हे वैमानिक होते. यानंतर पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचे काही व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्यात आले. ज्यामध्ये ते जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होते. पाकिस्तानचे हे वर्तन निषेधार्ह आणि दुर्दैवी आहे असं म्हणत भारतीय परराष्ट्र खात्याने पाकिस्तानची निंदा केली आहे.

भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करत हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र त्यांचे एक लढाऊ विमान भारतीय वायुदलाने पाडले. त्याचवेळी भारतीय वायुदलाचे मिग 21 हे विमानही अपघातग्रस्त झाले. हे विमान विंग कमांडर अभिनंदन चालवत होते. जे पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत. त्यांची सुखरूप सुटका करणं ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. तसेच त्यांचे रक्ताळलेले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणं हे पाकिस्तानचं अमानवीय लक्षण आहे असंही भारताने म्हटलं आहे.