भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी अभ्यासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सरल’ या उपग्रहासह सहा अन्य लघु अंतराळयाने अवकाशात सोडण्यात भारताला यश आले आहे. ईस्रोने तयार केलेल्या पीएसएलव्ही- सी २० या रॉकेटच्या सहाय्याने भारताने हे यश संपादन केले. येथील सतीश धवन केंद्रावरून सायंकाळी सहा वाजता उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला. प्रक्षेपणानंतर अवघ्या २२ मिनिटांत तो आपल्या कक्षेमध्ये स्थिरावला. चेन्नईपासून ११० कि.मी. अंतरावर असलेल्या या केंद्रातील नियंत्रण कक्षामधून भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हे प्रक्षेपण पाहिले.
मूळ वेळापत्रकाप्रमाणे सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी उपग्रहाचे प्रक्षेपण होणार होते, मात्र काही अवकाशस्थ घटकांशी टक्कर होण्याची शक्यता लक्षात घेऊन ते पाच मिनिटे पुढे ढकलण्यात आले.  
या उपग्रहासह ४१० किलो वजनाचा ‘सरल’ आणि त्याच्याबरोबर ऑस्ट्रियाचे ‘युनिब्राइट’ व ‘ब्राइट’, डेन्मार्कचा ‘एएयूसॅट’ आणि अमेरिकेचा ‘स्ट्रँड’ आदी लघु उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले. याबरोबरच कॅनडाचे २ लघुत्तम उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले. भारताच्या २३ मोहिमांपैकी सलग २२व्या वेळी पीएसएलव्हीचेउड्डाण यशस्वी ठरले आहे.