पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या सीमारेषेवर सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. या भागातील पँगाँग टीएसओच्या दक्षिण किनाऱ्यावरील महत्त्वाचा उंचावरील प्रदेश भारताने आपल्या ताब्यात घेतला आहे. चीनकडून सातत्याने या भागात एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारतीय जवानांनी चीनचे हे सर्व प्रयत्न उधळून लावले आहेत.

चीन, नेपाळ, भूतान सीमारेषेवर तैनात असलेले सैन्य हाय अलर्टवर आहे. उत्तराखंड, अरुणाचल, हिमाचल प्रदेश, लडाख आणि सिक्कीम सीमेवर तैनात असलेल्या इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारत नेपाळ आणि भूतान सीमेचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा बलला सर्तक राहण्यास सांगण्यात आले आहे.

पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आजही भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांध्ये चर्चा होईल. चुशूल/मोल्डो यथे ब्रिगेड कमांडर स्तराची चर्चा होणार असल्याची माहिती भारतीय लष्करातील सूत्रांनी दिली. दक्षिण किनाऱ्यावर चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा केलेला प्रयत्न, त्यातून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी ही बैठक होणार आहे. सोमवार आणि मंगळवारी झालेल्या बैठकीतून कोणताही तोडगा निघू शकला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

नाजूक स्थिती
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.

चीनकडून जड आणि तसंच हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्यात आले असून भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसोबत पूर्णपणे सुसज्ज आहेत. कालाटोप भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात असून इतर ठिकाणीही लष्करी तुकड्या तैनात असल्याने चिनी रणगाडे आणि वाहनांची हालचाल सध्या थांबली आहे.