नवी दिल्ली : भारत आता संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण मोहिमांचा भाग बनणार असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण या वर्षांत होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वित्र्झलडमधील इंटरनॅशनल सर्च अँड रेस्क्यू अ‍ॅडव्हायजरी ग्रुप (इन्साराग) ही संस्था हे प्रमाणन देत असते. एकूण ९० देश या संस्थेचे सदस्य असून शहरी व इतर शोध मोहिमांमध्ये त्यांचे चमू सहभागी होत असतात. भारतात ज्या प्रमाणे भारतीय मानक संस्था आहे, तशीच संयुक्त राष्ट्रांची ‘इन्साराग’ ही संस्था मानांकन किंवा प्रमाणीकरणाचे काम करते.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले, की भारताच्या प्रतिसाद दलास २०२१ मध्ये प्रमाणन मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ते मिळाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी मागणी केल्यास आपली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दले आपल्याला आंतरराष्ट्रीय मोहिमांसाठी पाठवावी लागतील.

सिंगापूर व ऑस्ट्रेलियाच्या मदत पथकांनी भारताची पथके कशी काम करतात, याची पाहणी सप्टेंबर २०१९ मध्ये केली होती. कोविड साथीमुळे पुढची प्रक्रिया होऊ शकली नाही. पण २०२१ मध्ये भारताच्या किमान दोन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद चमूंना ‘इन्साराग’ चमू म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे.