भारताचा पहिला दिशादर्शक प्रणाली उपग्रह येत्या जूनमध्ये सोडला जाणार आहे, अशी माहिती अंतराळ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. इंडियन रिजनल नॅव्हीगेशन सॅटेलाइट मालिकेतील आयआरएनएसएस-१ हा उपग्रह पीएसएलव्ही सी २२ या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख के. राधाकृष्णन  यांनी एका कार्यक्रमाच्यावेळी वार्ताहरांना सांगितले.
इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयआरएनएसएस ही स्वतंत्र दिशादर्शक उपग्रह प्रणाली आहे. किमान १५०० कि.मी इतक्या विस्तारित प्रदेशात १० मीटर इतक्या अचूकतेने चालू शकेल अशी ही दिशादर्शक प्रणाली आहे. अचूक स्थाननिश्चितीसाठी ही प्रणाली तयार करण्यात आली असून ‘नॅव्हीगेशन अँड टाइम’ सेवा सर्व प्रकारच्या उपकरणांवर २४ तास उपलब्ध करून देणे त्यामुळे शक्य होणार आहे. आयआरएनएसएस उपग्रहांमुळे दोन मूलभूत सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यात प्रमाणित स्थाननिश्चिती, विशेष अधिकृत वापरकर्त्यांसाठी मर्यादित सेवा या सेवांचा समावेश असेल.
‘आम्ही जून महिन्यात हा उपग्रह सोडणार आहोत’, असे सूतोवाच राधाकृष्णन यांनी ‘भारतीय दूरसंवेदन उपग्रह-पंचवीस वर्षांची यशोगाथा’ या विषयावरील परिसंवादात भाग घेतल्यानंतर वार्ताहरांना सांगितले. ते म्हणाले की, आयआरएनएसएस-१ हा उपग्रह कक्षेत सोडल्यानंतर तीन-चार महिन्यातच त्याची चाचणी होईल, या गटात एकूण सात उपग्रह सोडले जाणार आहेत. ‘आयआरएस १ ए’ या दूरसंवेदन उपग्रहाच्या प्रक्षेपणाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, पुढील एक वर्षांत भारतीय अंतराळ संशोधन संस्था एकूण १२ मोहिमा राबवणार आहे. त्यात ४५० कोटींच्या मंगळ मोहिमेचा समावेश आहे. ती मोहीम ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होईल. मंगळाच्या कक्षेत यान पाठवताना आपल्या तंत्रकौशल्यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी मदतही होईल. ‘जीएसएलव्ही एमके ३’ या उपग्रह प्रक्षेपकाची चाचणीही या वर्षांत घेतली जाणार आहे. या उपग्रह प्रक्षेपकाची बांधणी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर केली असून इन्सटॅ-४ श्रेणीतील ४५०० ते ५००० किलो वजनाचे उपग्रह सोडण्याची या प्रक्षेपकाची क्षमता आहे.