व्हिसा गैरव्यवहार आणि सत्य माहिती दडवून ठेवल्याप्रकरणी भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात अमेरिकेच्या मॅनहॅटन न्यायालयाने नव्याने आरोपपत्र दाखल करून अटक वॉरंट काढले आहे. खोब्रागडे यांचे पती आणि दोन मुले अमेरिकेत असून, जर देवयानी यांनी अमेरिकी भूमीत पाऊल टाकल्यास त्यांना तात्काळ अटक होऊ शकते. दरम्यान, खोब्रागडे यांच्याविरोधात अमेरिकेने पुन्हा अटक वॉरंट काढल्याने त्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला. अमेरिकेचा हा निर्णय अनावश्यक आणि दुर्दैवी आहे. त्याचे परिणाम दोन्ही देशांतील संबंधांवर होऊ शकतात, असे परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.
मोलकरणीचा छळ, सत्य माहिती दडवून ठेवणे आणि व्हिसा गैरव्यवहार या प्रकरणी देवयानी यांना १२ डिसेंबर रोजी न्यूयॉर्क येथे अटक करण्यात आली होती. मात्र अमेरिकन न्यायालयाने त्यांच्याविरोधातील सर्व आरोप रद्दबातल ठरवले होते. पण त्यांच्याविरोधात नव्याने आरोपपत्र ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार मॅनहॅटनमधील अ‍ॅटर्नी प्रीत भरारा यांनी न्यायालयात २१ पानी आरोपपत्र दाखल केले.
‘‘देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात आजच अटक वॉरंट काढले पाहिजे. त्यांच्या अटकेसंबंधीच्या आदेशाची माहिती भारताला देण्यात येईल आणि त्यानुसार त्यांना अटक करण्यासंबंधीची तारीख निश्चित करण्यात येईल,’’ असे भरारा यांनी न्यायालयाला सांगितल्यानंतर न्यायालयाने शनिवारी देवयानी यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले.