देशात दुसऱ्या दिवशी ५३ लाख मात्रा

मुंबई/ दिल्ली : लसधोरणात बदल केल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी देशभरात ८८ लाख नागरिकांना लसमात्रा देण्याचा विक्रम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र मोहिमेचा वेग मंदावला. देशात मंगळवारी ५३ लाख नागरिकांचेच लसीकरण होऊ शकले.

लसीकरण मोहीम कशी राबवावी, याचे प्रत्येक राज्याचे नियोजन वेगवेगळे आहे. काही राज्ये आठवडाभर तर काही राज्ये आठवडय़ातील काही दिवस लसीकरण करत आहेत. मध्य प्रदेशने सोमवारी सुमारे १७ लाख जणांचे लसीकरण केले असले तरी मंगळवारी केवळ ४७५९ जणांचेच लसीकरण केले आहे. कर्नाटकने सोमवारी १० लाख ८६ हजार जणांचे लसीकरण केले तर मंगळवारी तिथे ३ लाख ७८ जणांचे लसीकरण झाले. त्यामुळे एका दिवसाच्या कामगिरीचा मापदंड लावणे योग्य नाही, असे राज्यातील आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात काहीशी मंदावलेली राज्यातील लसीकरण मोहीम लशींचा साठा उपलब्ध होताच पुन्हा वेगाने सुरू झाली. त्यामुळे राज्यात सर्वाधिक लसीकरण मंगळवारी झाले. राज्याने आतापर्यत केलेल्या लसीकरणाचे विक्रम मोडत मंगळवारी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांचे लसीकरण केले. राज्याकडे सध्या सुमारे १८ ते २० लाख लशींचा साठा आहे.

साठा पुरेसा म्हणून..

लससाठा उपलब्ध झाल्यामुळे केंद्राच्या नव्या धोरणानुसार आधी ३० ते ४४ आणि मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग येत्या काळात वाढत जाईल.

..तर दिवसाला १० लाख लसमात्रा

यापूर्वीही आपण पाच लाखांहून अधिक लसीकरण एका दिवसात केले आहे. लशींचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहिला तर दिवसाला आठ ते दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे, असे आरोग्य (पान ४ वर) (पान १ वरून) आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत २ कोटी ८५ लाख जणांचे लसीकरण

देशभरात सर्वाधिक लसीकरण राज्यात झाले असून आतापर्यत सुमारे २ कोटी ८५ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल उत्तरप्रदेशमध्ये २ कोटी ६३ लाख, गुजरातमध्ये २ कोटी २५ लाख, राजस्थानमध्ये २ कोटी १६ लाख, पश्चिम बंगाल १ कोटी ९३ लाख आणि मध्यप्रदेशमध्ये १ कोटी ६७ लाख जणांचे लसीकरण झाले आहे.

सोमवारची स्थिती..

सोमवारी एका दिवसात देशभरात ८८ लाख जणांचे लसीकरण झाले. यात सर्वाधिक लसीकरण मध्यप्रदेशमध्ये केल्याचे केंद्रीय अहवालात म्हटले आहे. या अहवालात लसीकरण अधिक झालेल्या दहा राज्यांची आकडेवारी मांडली असून मध्यप्रदेशच्या खालोखाल कर्नाटक (११ लाख ३७ हजार),  उत्तरप्रदेश(७ लाख ४६ हजार), बिहार(५ लाख ७५ हजार), हरियाणा(५ लाख १५ हजार), गुजरात(५ लाख १५ हजार), राजस्थान(४ लाख ५९ हजार), तामिळनाडू( ३ लाख ९७ हजार), महाराष्ट्र (३ लाख ८५ हजार) आणि आसाम(३ लाख ६८ हजार) या देशांचा समावेश आहे. त्यामुळे लसीकरणाच्या कामगिरीमध्ये राज्याचा क्रमांक शेवटून दुसरा असल्याचे या अहवालात दिसत आहे.

राज्याचा नवा विक्रम..

राज्यात मंगळवारी विक्रमी लसीकरणाची नोंद झाली. दिवसभरात साडेपाच लाख नागरिकांना लस देण्यात आली. याआधी २६ एप्रिलला राज्याने ५ लाख ३४ हजार जणांचे लसीकरण केले होते.