सत्यता पडताळून कारवाईचे लष्कराचे आश्वासन

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्य़ात लष्कराने दगडफेकीपासून वाचण्यासाठी एका युवकाला जीपच्या पुढे बांधून फिरवल्याची चित्रफित ताजी असतानाच आणखी दोन नव्या चित्रफिती समाजमाध्यमांवर पसरल्याने तणावात भर पडली आहे. या चित्रफितींची सत्यता पडताळून पाहून कारवाई केली जाईल, असे आश्वासन लष्कराच्या वतीने देण्यात आले.

नव्या चित्रफितींमधील एकामध्ये लष्करी जवान पुलवामा जिल्ह्य़ातील पदवी महाविद्यालयामधून एका विद्यार्थ्यांला पकडून नेऊन, त्याला जमिनीवर झोपवून काठीने मारहाण करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फितीत लष्कराच्या ताब्यातील तीन युवकांना एका वाहनात जबरदस्तीने पाकिस्तानविरोधी घोषणा द्यायला लावल्या जात असल्याचे दिसत आहे. ‘तुम्हांला स्वातंत्र्य हवं आहे ना? असे म्हणून सैनिक त्यांना मारत आहेत. तसेच पाकिस्तान मर्दाबाद अशा घोषणा देण्यास भाग पाडत आहेत. लष्करी वाहनातील एका युवकाच्या डोक्यातून रक्त ओघळताना दिसत आहे.

या चित्रफिती नेमक्या कोणी तयार केल्या हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र त्या समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर राज्यातील तणावात भर पडली आहे. फेसबुक आणि अन्य माध्यमांवर त्यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या चित्रफितींची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.

यापूर्वी बडगाम जिल्ह्य़ात लष्करी जीपच्या पुढील भागावर एका युवकाला बांधून सैनिक आपला नागरिकांच्या दगडफेकीपासून बचाव करत असल्याची फित प्रसारीत झाली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्य पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला. लष्करानेही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली होती.

श्रीनगरमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू

श्रीनगर : श्रीनगरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावावर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) शनिवारी केलेल्या गोळीबारात एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सज्जाद अहमद असे त्याचे नाव असून तो बारामुल्लातील चांदुसा येथील रहिवासी होता. श्रीनगरच्या बाटमालू भागातील रेका चौक येथे जमावाने दगडफेक केल्यावर बीएसएफने गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण होऊन दुकाने बंद करण्यात आली.