योगविद्या ही भारताची जगाला देणगी, तर कुंगफू ही स्वसंरक्षणाची कला चीनचे जागतिक योगदान. या दोन नावांचा संयोग साधत दोन्ही देशांच्या संस्कृतीची जगाला ओळख करून देणारा एक चित्रपट उभय देशांतील अग्रगण्य चित्रपटनिर्मिती कंपन्या संयुक्तरीत्या तयार करणार आहेत. आजच यासंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग नुकतेच भारताच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्या वेळी उभय देशांच्या संस्कृतीचे आदानप्रदान करण्याबाबत सामंजस्य करार झाला होता. त्यानुसार संयुक्त चित्रपटनिर्मितीचा हा घाट घालण्यात आला आहे. चीनच्या शांक्झी प्रांतात कालपासून ‘झलक भारताची’ या शीर्षकांतर्गत भारतीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवात या संयुक्त चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
ही चित्रपटनिर्मिती भारताची ‘व्हायकॉम-१८’ आणि चीनची ‘ताही अँड शिने’ या दोन कंपन्या संयुक्तपणे करणार आहेत. या चित्रपटातून कुंगफू आणि योग यांच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या संस्कृतीची ओळख जगाला करून देण्यात येणार आहे. जगविख्यात कलाकार जॅकी चॅन या चित्रपटात काम करण्याची शक्यता आहे. तर ‘स्टोन एज व्ॉरियर्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा हाँगकाँगमधील प्रख्यात दिग्दर्शक स्टॅन्ली टोंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची कथा व त्याचा निर्मिती खर्च लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.