वॉशिंग्टन : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत अमेरिकी प्रतिनिधिगृहात मांडण्यात आलेला ठराव हा तेथील परिस्थितीचे योग्य चित्रण करणारा नाही, तसेच त्यात विपर्यस्त बाबींचा समावेश आहे, अशी टीका परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केली. प्रमिला जयपाल यांचा समावेश असलेल्या अमेरिकी काँग्रेस सदस्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास जयशंकर यांनी नकार दिला. जयपाल यांनी प्रतिनिधिगृहात काश्मीरमधील परिस्थितीवर टीका करून तेथील निर्बंध उठवण्याची मागणी करणारा प्रस्ताव मांडला होता.

ते म्हणाले,की भारतीय—अमेरिकी काँग्रेस सदस्य प्रमिला जयपाल व इतर संबंधित सदस्यांशी चर्चा करण्याची आपल्याला इच्छा नाही, त्यांनी आधीच त्यांची मते बनवलेली आहेत व त्यांनी काश्मीरमधील स्थितीवर मांडलेला प्रस्ताव हा पक्षपाती स्वरुपाचा आहे. त्यात वस्तुस्थिती मांडण्यात आलेली नाही.

प्रमिला जयपाल यांनी या महिन्याच्या सुरुवातीला काश्मीरबाबत प्रतिनिधिगृहात प्रस्ताव मांडून तेथील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी हा प्रस्ताव मांडून भारताची प्रतिमा विनाकारण खराब करू नये असा सल्ला त्यांना अमेरिकेतील भारतीयांनी दिला होता, पण तरी त्यांनी हट्टीपणा करून तो प्रस्ताव मांडला होता.

जम्मू काश्मीरमध्ये लादलेले निर्बंध तातडीने मागे घेऊ न  धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात यावे असे त्यात म्हटले आहे. पाच ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करून तेथील दूरसंचार व्यवस्था व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. कालांतराने दूरसंचार सेवा काही प्रमाणात सुरळीत केली असली तरी इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे.

प्रमिला जयपाल यांनी मांडलेल्या प्रस्तावाबाबत विचारले असता जयशंकर यांनी सांगितले,की त्या प्रस्तावाची माहिती मला आहे, पण त्यात जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचे योग्य चित्रण नाही. भारत सरकारने ज्या उपाययोजना केल्या त्याचा उल्लेख नाही. प्रमिला जयपाल यांना भेटण्याची आपल्याला अजिबात इच्छा नाही.

तो प्रस्ताव तुम्ही गांभीर्याने घेता का, या प्रश्नावर जयशंकर यांनी सांगितले,की ज्या लोकांना वस्तुस्थितीची माहिती आहे त्यांच्याशी बोलण्याची आपली तयारी आहे, पण ज्यांनी आधीच आपली मते निश्चित केली आहेत त्यांच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही.

‘दी वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीनुसार जयशंकर हे अमेरिकी काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्यांशी चर्चा करणार होते, पण त्यांच्यात प्रमिला जयपाल यांचा समावेश असल्याचे समजताच त्यांनी जयपाल यांना वगळण्याची मागणी केली. ती फेटाळली गेल्याने जयशंकर यांनी अमेरिकी काँग्रेस सदस्यांशी चर्चा रद्द केली.

जयशंकर हे परराष्ट्र विषयक समितीचे अध्यक्ष एलियट एल एंजेल व रिपब्लिकन सदस्य मायकेल मॅककोल, तसेच इतर सदस्यांचा समावेश असलेल्या प्रतिनिधी मंडळास भेटणार होते.

जयपाल यांची टीका

यावर जयपाल यांनी सांगितले, की जयशंकर यांनी आपल्याशी बोलणे टाळले याचाच अर्थ भारत सरकारची विरोधी किंवा त्यांच्या विचारांशी असहमती असलेल्या कु णाचेही काही  ऐकून घ्यायची तयारी नाही.