अमेरिकी कंपन्यांना भारतात अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे अमेरिकी काँग्रेसमध्ये सांगण्यात आल्यानंतर भारताच्या राजदूत निरूपमा राव यांनी अमेरिकी उद्योगांप्रमाणे भारतीय उद्योगांनाही काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असे आज सांगितले.
जशा अमेरिकी उद्योगांच्या काही चिंता आहेत तशाच भारतीय उद्योगांच्याही काही चिंता आहेत. नॅसकॉमच्या अहवालानुसार अमेरिकेत एक लाख भारतीय नोकरी करतात व अप्रत्यक्ष दोन लाख रोजगारांची निर्मिती होते. पण त्यात नियंत्रणे घातली जात आहेत. यावर आम्ही अमेरिकी सरकारशी संवाद सुरूही करू शकलेलो नाही. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. भारतातून अमेरिकेत जास्त गुंतवणूक येईल, त्यामुळे आर्थिक भागीदारी भक्कम होईल, त्यामुळे दोन्ही देशात व्यापारी व आर्थिक सहकार्याची गरज आहे, असे निरूपमा राव म्हणाल्या.
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज या वॉशिंग्टन येथील संस्थेतील कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, भारताची शाश्वत आर्थिक वाढ व भांडवली तसेच तांत्रिक गरजांची पूर्तता हे दोन्ही देशातील व्यापारी भागीदारीकरिता आवश्यक घटक आहेत. भारत ही जगातील एक वाढती बाजारपेठ आहे व त्यामुळे तेथे साखळी उद्योगांना वाव आहे. जनरल इलेक्ट्रीक, हनीवेल व आयबीएम यांसारख्या कंपन्यांसाठी भारत हा सर्वात मोठी आर अँड डी सेंटर (संशोधन व विकास केंद्रे) असलेला देश आहे. भारत व त्याच्या धोरणाबाबत अमेरिकी कंपनी क्षेत्राने ज्या तक्रारी केल्या आहेत त्यावर ओझरता उल्लेख करताना श्रीमती राव म्हणाल्या की, अमेरिकेच्या धोरणांबाबत आमच्याही (भारतीय उद्योगांच्याही) काही समस्या आहेत.