एच १ बी व्हिसा पद्धत सहा महिन्यांसाठी स्थगित करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय पदाचे उमेदवार टेड क्रूझ यांनी केली आहे. एच १ बी व्हिसा योजना राबवताना अनेक घोटाळे झाले असून त्यामुळे हा व्हिसा तूर्त स्थगित करावा व चौकशी करण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे. या गैरप्रकारात काही भारतीयांचाही समावेश आहे.

स्थलांतरित प्रणाली जर मजबूत व सुरक्षित करायची असेल तर राष्ट्रीय सुरक्षा व अमेरिकी कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्त करून त्यांनी सांगितले की, एच १ बी व्हिसाच्या गैरवापराच्या घटनांची चौकशी पूर्ण होईपर्यंत १८० दिवस एच १ बी व्हिसा पद्धत स्थगित करण्यात यावी. स्थलांतरित धोरणात सुधारणा राबवण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली. एच १ बी व्हिसाचा गैरवापर झाल्याचे नवीन आरोप सामोरे आले आहेत. खरेतर या कार्यक्रमातून अमेरिकी लोकांच्या हिताला धक्का लागता कामा नये. आर्थिक वाढ अडून राहता कामा नये. क्रूझ हे टेक्सासचे सिनेटर असून त्यांनी एच १ बी व्हिसाबाबत ठोस भूमिका घेतली आहे. स्थलांतर कायदेशीर असेल तर त्यामुळे आर्थिक विकासात बाधा येणार नाही व अमेरिकी कामगार विस्थापितही होणार नाहीत. जन्माने नागरिकत्व देण्याची पद्धत रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

भारतीयांसह परदेशी कामगारांना नोकऱ्या देण्याच्या पद्धतीवर टीका

करमणूक क्षेत्रातील डिस्ने कंपनी एच१ बी व्हिसावर अमेरिकेत आलेल्या भारतीयांसह स्वस्तात काम करणाऱ्या कामगारांना नोकऱ्या देणार असल्याच्या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवारीच्या शर्यतीतील दावेदार माइक हुकाबी यांनी टीका केली आहे. ते अरकान्ससचे माजी गव्हर्नर आहेत. ऑरलँडो फ्लोरिडा येथील भाषणात त्यांनी सांगितले की, अमेरिकी लोकांना स्थलांतरित करणारे धोरण आम्हाला नको आहे. लोकप्रिय असलेल्या डिस्नेलँड जेथून जवळच आहे त्या ठिकाणी हुकाबी यांचे हे भाषण झाले.
ते म्हणाले की, एच १ बी व्हिसा प्रक्रियेमुळे डिस्नेत अनेक परदेशी कर्मचारी आले आहेत. कमी वेतनात ते काम करू शकतात त्यामुळे अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून तेथे भारतीय व इतर देशांच्या लोकांना संधी मिळाली, हा अपमान आहे.