अमेरिकेत भारतीयांवर वर्णद्वेषी हल्ले होत असतानाच मॅनहॅटनमध्ये ३४ वर्षांच्या भारतीय तरुणाने धाडस दाखवत एका महिलेचे प्राण वाचवले आहे. पण या महिलेचे प्राण वाचवताना चोरट्यांनी या तरुणाचीच बॅग पळवली आहे. या घटनेने तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी चोरट्यांच्या या कृत्यावर संताप व्यक्त होत आहे.

अमेरिकेत राहणारा ३४ वर्षाचा अनिल वन्नावल्ली हा तरुण आणि त्याची २६ वर्षाची महिला सहकारी मॅनहॅटनमधून कामावरुन घरी परतत होते. एडिसन स्थानकात ट्रेनची वाट बघत असताना अनिलसोबत काम करणाऱ्या महिला सहकाऱ्याचा तोल गेला आणि ती रेल्वे रुळावर पडली. समोरुन ट्रेन येत असल्याने काही क्षणासाठी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पण अनिलने जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळांवर उडी मारली आणि महिला सहकाऱ्याचे प्राण वाचवले.

महिला सहकाऱ्याचे प्राण वाचवताना अनिलने त्याची बॅग प्लॅटफॉर्मवर ठेवली होती. या बॅगेत लॅपटॉप, चार्जर, हेडफोन्स आणि रोख रक्कम असे सुमारे ९०० डॉलर्सचा ऐवज होता. चोरट्यांनी ही बॅग लंपास केली. अशा परिस्थितीत कोण बॅग चोरी कशी करु शकतो असा उद्विग्न सवाल अनिलने उपस्थित केला आहे. अनिलने दाखवलेल्या धाडसाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनिलला पोलिसांनी एक हजार डॉलरचा धनादेश दिला आहे.

अनिलने ज्या महिलेचे प्राण वाचवले त्या महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिवसभरापासून काही न खाल्ल्याने तिला प्लॅटफॉर्मवर भोवळ आली आणि ती खाली पडली असे तिने सांगितले. तिचा पाय फ्रॅक्चर झाला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. वन्नवल्लीची बॅग चोरणाऱ्याचा शोध घेत असून स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून बघितले जात आहेत. एका ठिकाणी अनिलने समाजासमोर चांगला आदर्श निर्माण केला असतानाच दुसरीकडे चोरट्यांनी त्याचीच बॅग पळवण्याची घटना दुर्दैवी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिल हा १० वर्षांपूर्वी कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाला होता.