पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील तणाव पूर्णपणे कमी करुन, परिस्थिती सामान्य करण्यासाठी काल भारतीय आणि चिनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. तब्बल १५ तास चाललेल्या या बैठकीत नियंत्रण रेषेजवळ परिस्थिती पहिली होती तशी, ‘जैसे थे’ करा, असे भारतीय लष्कराने चिनी सैन्याला स्पष्टपणे सांगितले.

सीमा व्यवस्थापन आणि पुन्हा शांतता प्रस्थापित होण्यासाठी परस्पर सहमतीने ठरलेल्या सर्व गोष्टी पाळाव्या लागतील असे भारतीय लष्कराने चिनी सैन्याला स्पष्ट केले आहे. सरकारी सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. दोन्ही देशाच्या वरिष्ठ सैन्य कमांडर्समध्ये अनेक जटिल मुद्दावर प्रदीर्घ चर्चा झाली. बुधवारी रात्री २ वाजता ही बैठक संपली. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

पूर्व लडाखमधील परिस्थिती सुधारण्याची जास्तीत जास्त जबाबदारी आता चीनवर आहे असे सूत्रांनी सांगितले. चिनी सैन्याने पूर्व लडाखमधील चार ठिकाणी घुसखोरी केली होती. या सर्व ठिकाणाहून चिनी सैन्य आता माघारी फिरले आहे. पँगाँग टीएसओ हा कळीचा मुद्दा होता. पण तिथूनही चिनी सैनिक मागे हटले आहेत. मंगळवारी सकाळी भारतीय हद्दीतील चुशूल येथे सकाळी ११ वाजता लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चौथ्या फेरीची चर्चा सुरु झाली.

बुधवारी रात्री २ वाजता ही बैठक संपली. गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर परिस्थिती तणावग्रस्त बनली होती. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. त्यानंतर एनएसए अजित डोवाल आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चिनी सैन्याची माघारी फिरण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर तणाव बऱ्याच प्रमाणात निवळला. पण अजूनही परिस्थिती पहिल्यासारखी जैसे थे झालेली नाही.