जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्येने आता १७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल ५४ हजार ७३६ नवे करोना पॉझिटिव्ह आढळले व ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १७ लाख ५० हजार ७२४ वर पोहचली आहे.

देशातील १७ लाख ५० हजार ७२४ करोनाबाधितांमध्ये सध्या ५ लाख ६७ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, ११ लाख ४५ हजार ६३० जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३७ हजार ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

चिंताजनक बाब म्हणजे, फक्त जुलै महिन्यात भारतामध्ये ११.१ लाख करोनाबाधित रुग्ण आढळले असून १९ हजार १२२ जणांना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशात करोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ४९ टक्के मृत्यू २० शहरांमध्ये झाले आहेत. या शहरात करोना संक्रमणाच्या सरासरीतही वाढ झालेली आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत देशात ५ लाख ६६ हजार ८४० इतकी करोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली.

भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे.

संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांनी ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ला एक शिफारस केली आहे. यामध्ये सिरम इन्स्टीट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यास सांगितलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिली.