करोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. या विषाणूचा भारतातील प्रादुर्भावही दिवसागणिक वाढतच चालला आहे. भारतात आतापर्यंत ३१ लाख ६७ हजार ३२४ जणांना करोनाची बाधा झाली आहे. मागील २४ तासांत देशात ६० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ६० हजार ९७५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८४८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५८ हजार ३९० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत देशात २४ लाख ४ हजार ५८५ जणांनी करोनावर मात केली आहे. तर सात लाख ४ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार २४ ऑगस्ट २०२० पर्यंत देशात तीन कोटी ६८ लाख २७ हजार ५२० करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सोमवारी देशात ९ लाख २५ हार ३८३ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी जवळपास ६१ हजार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

देशात करोना चाचणीची संख्या वाढल्यामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यात करोनाबाधितांची संख्या आधिक वाढत आहे. देशातील करोनामुक्तीचा दर ७५ टक्केंपेक्षा आधीक झाला आहे.