पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या सर्वात वेगवान ट्रेन 18 मध्ये दुसऱ्याच दिवशी बिघाड झाला. शनिवारी सकाळी वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीपासून 200 किमी अंतरावर असतानाच हा बिघाड झाला. वंदे भारत एक्स्प्रेसला रविवारी पहिल्या कमर्शिअल रनसाठी वाराणसीहून दिल्लीला आणलं जात होतं. यावेळी ट्रेनचं इंजिन फेल झालं. शेवटच्या डब्याचा ब्रेकदेखील जाम झाला होता. यासोबत काही डब्यांमधील वीज गायब झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन पूर्णपणे बंद पडण्याआधीच ट्रेनच्या मागील डब्यातून काही आवाज येत होते. संशय आल्याने लोको पायलटने ट्रेनचा वेग कमी केला. मागील चार डब्यांमधून धूर आणि विचित्र वास येत होता. यानंतर चाकांमध्ये अडचण येऊ लागली आणि शेवटच्या डब्याचे ब्रेक जाम झाले. उत्तर प्रदेशातील टुंडा जंक्शनपासून 15 किमी अंतरावर हा प्रकार घडला. इंजिनिअर्सनी 10 किमी ताशी वेगाने ट्रेन पुन्हा सुरु केली होती. पण नंतर ट्रेन थांबवावी लागली.

ट्रेन दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु असून रविवारी ट्रेन आपल्या निश्चित वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. देशभरात पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन संताप असतानाच यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्धाटन करण्यात आलं होतं. ट्रेन दिल्ली ते वाराणसी अंतर 45 मिनिटात पूर्ण करेल असा दावा आहे.