जगातल्या सर्वात चांगल्या कंपनीत आपल्याला नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता चांगल्या कंपनीची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते. पण त्यातही उत्तम पगाराबरोबरच जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. यामध्ये सध्या सगळ्यात आघाडीवर कोणती कंपनी आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून त्याचे उत्तर मिळाले आहे. मायक्रोसॉफ्ट इंडिया ही कंपनी या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक आवडणारी कंपनी असल्याचे समोर आले आहे. रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले असून अॅमेझॉन इंडिया ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

यानंतर हिंदुस्तान लिव्हर, आयबीएम इंडिया, आयटीसी ग्रुप, लार्सेन अँड टर्बो, मर्सिडिज बेन्झ इंडिया, सॅमसंग इंडिया, सोनी इंडिया आणि टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेस या कंपन्यांचा क्रमांक लागतो. यामध्ये माहिती तंत्रज्ञानामध्ये टीसीएस म्हणजेच टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेस ही कंपनी असून लार्सन अँड टर्बो ही पायाभूत सोयीसुविधा आणि बांधकाम यासाठी आघाडीवर आहे. रँडस्टॅडचे व्यवस्थापकीय संचालक पॉल म्हणाले, कर्मचाऱ्यांना आपण कुठे काम करायचे याबद्दल आवडीनिवडी असतातच पण त्याशिवाय किती क्षमता वापरुन काम करायचे याबाबतही आवडी-निवडी असतात. यामध्ये आयटी क्षेत्राला ६९ टक्के ऑटोमोटीव्ह क्षेत्राला ६८ टक्के आणि रिटेल क्षेत्राला ६७ टक्के लोकांची पसंती असल्याचे समोर आले आहे.

भारतीय कर्मचारी नोकरी निवडताना पगाराबरोबरच कंपनीकडून मिळणाऱ्या सुविधांचाही विचार करतात असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यानंतर काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल, नोकरीची शाश्वती, करीयरमध्ये होणारा फायदा आणि सशक्त मॅनेजमेंट यांचा विचार कर्मचाऱ्यांकडून केला जातो असाही निष्कर्ष यामधून समोर आला आहे. करियरमध्ये वृद्धी होत नसल्याने आम्ही नोकरी सोडतो असे ४३ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचीही नोंद यामध्ये करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी ३० देशातील १ लाख ७५ हजारहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.