इराणी कंपन्यांना तेलाच्या थकबाकीची रक्कम अदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून इराणच्या दौऱ्यावर जात आहेत. भारतीय तेलशुद्धीकरण कारखाने इराणी कंपन्यांना तेलाच्या थकबाकीपोटी ६.४ अब्ज अमेरिकी डॉलर्स देऊ लागतात. त्यात चार वर्षांत प्रथमच यातील काही रकमेचा पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे. मोदी इराणच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच तेलाची रक्कम अदा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कमही रिझव्‍‌र्ह बँकेच्या मदतीने अदा केली जाणार आहे. निर्बंधांमुळे इराणचे हे पैसे फेब्रुवारी २०१३ पासून अडकले होते. एकूण ६.४ अब्ज डॉलर्सची थकबाकी होती त्यापैकी निम्मी अदा करण्यात आली आहे.
मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि. या कंपनीने ५०० दशलक्ष डॉलर्स, इंडियन ऑइल कार्पोरेशन या कंपनीने २५० दशलक्ष डॉलर्स तर खासगी इस्सार ऑईल्स कंपनीने ५०० दशलक्ष डॉलर्स अदा केले आहेत. तेलशुद्धीकरण कारखान्यांनी त्यांनी इराणकडून घेतलेल्या तेलाची थकबाकी युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून दिली असून ती नॅशनल इराणियन ऑइल कंपनीच्या खात्यावर तुर्कस्तानातील ‘हाक’ बँके च्या माध्यमातून जमा झाली. सुरूवातीला बँकेत डॉलर्स जमा करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष रक्कम अदा करताना ती युरोत दिली आहे. जानेवारीत इराणवरील र्निबध उठल्यानंतर परकी चलनात इराणला प्रथमच रक्कम अदा झाली आहे.
एमआरपीएल कंपनी २.६ अब्ज डॉलर्स देणे लागते; त्यापैकी ५०० दशलक्ष डॉलर्स देण्यात आले आहेत. अडीचशे दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आयओसीने अदा केले असून आता त्यांनी ३१० दशलक्ष डॉलर्स अदा करणे बाकी आहे. एस्सार ऑइल इराणला २.६ अब्ज डॉलर्स देणे लागते तर एपीसीएल एनर्जी लि. या कंपनीकडे ६० दशलक्ष डॉलर्सची थकबाकी कायम आहे.

चाबहार बंदर विकास करार अपेक्षित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इराण भेटीत इराणमधील चाबहार बंदराबाबत करार होणे अपेक्षित आहे. इराणच्या किनाऱ्यावरील या बंदराचा विकास करण्यात भारत इराणला मदत करत आहे. इराणच्या आखातात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर वसलेल्या चाबहार बंदरात पाय रोवण्याची संधी मिळाल्याने भारताला या विभागात सामरिक फायदा होणार आहे. येथून जवळच पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित करत आहे. तेथून भारताची आखातात कोंडी करण्याच्या प्रयत्नांना आता भारत खीळ घालू शकेल. चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे.