चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये दुसऱ्या तिमाहीतील ६.५ टक्क्यांवरुन जीडीपी वाढीचा दर तिसऱ्या तिमाहीत ७.२ टक्क्यांवर पोहोचला. अर्थतज्ज्ञांनी वर्तवलेल्या अनुमानापेक्षा हा दर खूपच चांगला आहे. विशेष म्हणजे भारताने यामध्ये चीनलाही मागे टाकले आहे. यामुळे भारत जगात वेगाने प्रगती करणारा देश ठरला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएसओ) हा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर हा ६.५ टक्के इतका राहिला होता. त्यामुळे हा दर तिसऱ्या तिमाहीत जास्तीत जास्त ६.९ टक्के राहिल असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र, हे भाकीत खोटे ठरवित भारतीय अर्थव्यवस्थेने विकासात चांगली वाढ नोंदवली आहे. चिनच्या जीडीपी वाढीचा दर हा ६.८ टक्के इतका आहे, तर भारताने ७.२ टक्के अशी चांगली वाढ नोंदवली आहे. त्यामुळे भारत जगात वेगाने विकास करणारा देश ठरला आहे.

वित्तीय सेवा देणारी जागतिक संस्था मॉर्गन स्टेनली यांच्या एका अहवालानुसार, डिसेंबरच्या तिमाहीत भारताच्या सकल घरगुती उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, अर्थतज्ज्ञांनी हाच दर ६.९ टक्के राहिल असा अंदाज वर्तवला होता. रॉयटर्सने केलेल्या ३५ अर्थतज्ज्ञांच्या एका सर्वेक्षणात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर असे झाले तर भारत यामध्ये चीनलाही मागे टाकेल असे सांगण्यात येत आहे. या तिमाहीत चिनचा जीडीपी वाढीचा दर हा ६.८ टक्के इतका राहिला आहे.