लक्ष ठेवा, नवी घुसखोरीही रोखा पण आक्रमक पाऊलही उचलू नका : लष्कराला आदेश
भारतीय हद्दीतील पूर्व लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात चीनने जर त्यांच्या सैनिकांची संख्या वाढविली तर आम्हीही आमच्या सैनिकांची संख्या वाढवू, असा इशारा भारताने दिला आहे.
अर्थात मुळात जे सैनिक घुसले आहेत त्यांना हुसकावण्याबाबत हा इशारा नसून नव्या घुसखोरीपुरता आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चीन सरहद्दीलगत भारतीय सैन्याला सज्जतेचे आदेश देण्यात आले असून भारतीय हद्दीत चीनच्या बाजूने होणारी घुसखोरी हाणून पाडण्यासही सांगण्यात आले आहे.
१५ एप्रिलला भारतीय हद्दीत चीनच्या काही सैनिकांनी तंबू ठोकले आणि त्यांची वर्दळ तेथे सुरू झाली. भारताने त्यास तीव्र आक्षेप घेतला तेव्हा आम्ही आमच्याच हद्दीत आहोत, असा दावा चीनने केला. आता भारतानेही त्यांच्या तळालगतच लष्कर व इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांची छावणी उभारली आहे. चिनी सैनिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे पण कोणतेही आक्रमक पाऊल उचलू नये, असेही लष्कराला सांगण्यात आले आहे.
हालचालींना वेग
लष्करप्रमुख जन. विक्रमसिंग यांनी गुरुवारी संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टोनी यांची भेट घेऊन लडाख आणि तेथील विद्यमान परिस्थितीची त्यांना विस्तृत कल्पना दिली.
घुसखोरीवरून उभय देशांत सध्या तणाव निर्माण झालेला असला तरी भारताचे परराष्ट्रमंत्री सल्मान खुर्शीद हे येत्या ९ मे रोजी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. चीनचे पंतप्रधान ली केक्विआंग हे त्यानंतर मे महिन्याच्या उत्तरार्धात भारतभेटीवर येत असून, त्याआधी खुर्शीद हे चीनला जात असल्यामुळे या दौऱ्यास महत्त्व आहे.
आमच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग करून कोणत्याही प्रकारचे चिथावणीखोर वर्तन केलेले नाही, याचा पुनरुच्चार चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.
चीन आणि भारत या दोन्ही देशांमधील सीमेची अद्याप आखणी झालेली नाही आणि सीमेवरील प्रांतांमध्ये काही वेळा अशा प्रकारच्या कुरबुरी होतच असतात, असे त्यांनी सांगितले.